मध्य प्रदेशातील खंडवा जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी एक भलताच प्रकार पाहायला मिळाला. शहरात मोकाट कुत्र्यांची वाढची दहशत आणि प्रशासनाचा अनागोंदी कारभार याविरोधात एका तरुणाने चक्क ‘कुत्र्याचा पोशाख’ घालून जनसुनावणीत प्रवेश केला. तरुणाच्या या अनोख्या आंदोलनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

४० लाख रुपये खर्च, पण १३ हजारांहून अधिक लोकांना कुत्र्यांचा चावा

या हटके आंदोलनामागे पालिकेचा मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. खंडवा पालिकेने मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीसाठी तब्बल ४० लाख रुपयांचे बिल मंजूर केले आहे. मात्र, प्रत्यक्षात एकही कुत्र्याची नसबंदी झाली नसून हा केवळ कागदोपत्री घोटाळा असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.

शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिक, लहान मुले आणि पादचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आतापर्यंत तब्बल १३,२२५ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

“नगरपालिकेने लाखो रुपये खर्च करूनही कुत्र्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतेच आहे. ज्या कंपनीला कंत्राट दिले होते, त्यात मोठा गैरव्यवहार झाला आहे. दोषींवर कडक कारवाई व्हावी यासाठी आम्ही हे आंदोलन केले.” – मुल्लू राठोड, विरोधी पक्षनेते, खंडवा नगरपालिका

प्रशासनाकडून चौकशीचे आदेश

या संपूर्ण प्रकरणाची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. खंडवाचे अप्पर जिल्हाधिकारी काशीराम बडोले यांनी सांगितले की, “नसबंदीच्या नावाखाली ४० लाखांचे खोटे बिल काढल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. याप्रकरणी महापालिका आयुक्तांशी चर्चा झाली असून, आरोपांची चौकशी केली जाईल. गैरव्यवहार सिद्ध झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल.”