खरगोन : मध्यप्रदेशच्या खरगोन शहरात रामनवमीच्या दिवशी झालेल्या धार्मिक हिंसाचारानंतर बेपत्ता झालेल्या एकाचा मृतदेह सापडल्यामुळे दंगलीतील पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे.

इब्रेश खान याचा मृतदेह खरगोनच्या आनंदनगर भआगात सापडला. मात्र येथे शीतपेटीची व्यवस्था नसल्यामुळे तो येथून सुमारे १०० किलोमीटरवर असलेल्या इंदूरच्या शासकीय रुग्णालयात आठ दिवसांसाठी ठेवण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी आठ दिवस हा मृत्यू लपवल्याचा आरोप इब्रेशच्या नातेवाईकांनी सोमवारी केला.

तथापि, खरगोनमध्ये रामनवमी उत्सवादरम्यान दंगल उसळल्यानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजे ११ एप्रिललाच शवचिकित्सेनंतर या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आल्याचा दावा राज्य सरकारने केला. दगडांमुळे डोक्याला झालेल्या गंभीर जखमांमुळे इब्रेश मरण पावल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

‘धार्मिक हिंसाचाराच्या रात्री खरगोनच्या आनंदनगर भागात एक अनोळखी मृतदेह सापडला. शीतपेटीची व्यवस्था नसल्याने तो इंदूरच्या शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आला. इब्रेशच्या कुटुंबियांनी १४ एप्रिलला तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. त्यांनी मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर रविवारी मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे’, असे प्रभारी पोलीस अधीक्षक रोहित काशवानी यांनी पत्रकारांना सांगितले.