Khawaja Asif Afghan Journalist Video Viral : पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या एका हावभावामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या (UNGA) ८१ व्या अधिवेशनादरम्यान एका अफगाण महिला पत्रकाराने त्यांना तालिबान आणि अफगाण महिलांच्या स्थितीबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना आसिफ यांनी केलेल्या कृतीमुळे हा वाद निर्माण झाला आहे.

महिला पत्रकाराने काय प्रश्न विचारला?

महिला पत्रकाराने विचारलं, “आता तालिबानला तुमचा काय संदेश आहे? त्यांनी अफगाण महिलांबाबतचे आपले धोरण बदलावे का? आणि सुरुवातीला जेव्हा ते तुमचे मित्र होते, तेव्हा पाकिस्तानने त्यांना हे का शिकवलं नाही?” यावर ख्वाजा आसिफ यांनी पत्रकाराचा प्रश्न मध्येच थांबवला आणि थेट उत्तर देण्याचं टाळलं. पत्रकाराच्या कपड्यांकडे बोट दाखवत ते म्हणाले, “तिथे (अफगाणिस्तानमध्ये) अशा परत जाऊ नका. नाहीतर ते तुमच्यासोबत…” असं म्हणत त्यांनी आपल्या गळ्यावरून हात फिरवण्याचा (गळा कापण्याचा) हावभाव केला.

सोशल मीडिया युजर्सनी या हावभावाचा अर्थ ‘अफगाणिस्तानमध्ये परत गेल्यास त्या पत्रकाराची हत्या केली जाऊ शकते’ असा लावला असून, या वक्तव्यानंतर आसिफ आणि त्यांच्यासोबतचे इतर पुरुष हसल्यामुळे त्यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर हल्ले

हा वाद अशा वेळी समोर आला आहे जेव्हा दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणलेले आहेत. पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील १० ठिकाणांवर अचूक हवाई आणि ड्रोन हल्ले केले आहेत. पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी सांगितलं की, अफगाणिस्तानकडून झालेल्या ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली. अफगाणिस्तान सरकारने या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला असून याला भ्याड आणि गुन्हेगारी कृत्य म्हटलं आहे. अफगाण सरकारचे प्रवक्ते झबिउल्लाह मुजाहिद यांनी सांगितलं की, या हल्ल्यात चार अफगाण नागरिक मारले गेले असून त्यांनी पाकिस्तानला याचे गंभीर परिणाम भोगण्याचा इशारा दिला आहे.