ही तर सरळ सरळ लूटमार आहे असं म्हणत नाश्त्याचं ७०० रुपये बिल आल्याचं एका माणसाने व्हायरल केलं आहे. दिल्लीतल्या अपोलो रुग्णालयात हल्दीरामचं कँटीन आहे तिथे डोसा २७४ रुपयांना आणि चहा ७४ रुपयांना आहे असं म्हणत या माणसाने बिलाचा स्क्रीन शॉट शेअर केला आहे. तसंच आमची खुली लूट सुरु आहे असंही म्हटलंय.

नेमकं प्रकरण आहे काय?

संतोष भारतवंशी या माणसाने एक्स या मायक्रो ब्लॉगिंग साईटवर अपोलो रुग्णालयातील कँटीनचं बिल पोस्ट केलं आहे. अपोलो रुग्णालय दिल्लीतल्या इंद्रप्रस्थ या ठिकाणी आहे. हॉस्पिटलच्या आतल्या भागात हल्दीरामचं आऊटलेट आहे. या ठिकाणी त्याने जो नाश्ता केला त्याचं हे बिल आहे. दोन मसाला डोसा एक मसाला चहा आणि एक मसाला ताक यांचं बिल ६७३ रुपये ९५ पैसे झालं आहे. त्यावर ३४ रुपयांचा जीएसली टालगाल आहे आणि एकूण बिल ७०८ रुपये झालं आहे. ज्यानंतर या माणसाने हे बिल शेअर करत संताप व्यक्त केला आहे. ही आमची लूटमार आहे असं या माणसाने म्हटलं आहे. सोशल मीडियावर हे बिल चर्चेचा विषय ठरलंं आहे. दोन मसाला डोसा, एक चहा आणि एक मसाला ताक याचं बिल ७०० रुपये? ही तर खरंच आमची लूट चालली आहे. एक बाटली ताकाचे ८५ रुपये घेत आहेत. तर चहाच्या एका कपाचे ७४ रुपये आणि एक मसाला डोसा २७४ रुपयांना. ही आमची लूटमारच आहे असं संतोष भारतवंशी यांनी म्हटलं आहे. News 18 ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

रुग्णालयात आल्यानंतर असंही बँक बॅलन्सचा ताळमेळ राहात नाही

संतोष भारतवंशी पुढे म्हणतात, हॉस्पिटलला आपण आलो की असंही बँक बॅलन्सचा ताळमेळ राहात नाही, बिघडतोच. रुग्णाचे औषधोपचार, डॉक्टरांची फी आणि हॉस्पिटलचे इतर खर्च हे होत असताना आता खाण्यापिण्यात अशी लूट चालली आहे. हद्दच झाली, लूटमारीची. एवढंच नाही तर संतोष पुढे म्हणतात हल्दीरामच्या प्रत्येक आऊटलेटमध्ये ३० ते ४० टक्के सूट देतात. ब्रेकफास्ट ऑर्डर केल्यावर ही सूट मिळतेच. पण रुग्णालयातल्या आऊटलेटमध्ये कुठलीही सूट नाही. ही सरळसरळ लूटमार आहे असं म्हणत संतोष यांनी त्यांचा संताप व्यक्त केला आहे.

सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया

एका युजरने म्हटलं आहे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. अशीच लूट माझीही केली गेली होती. दुसरा युजर म्हणतो, हॉस्पिटलमधल्या हल्दीराम आऊटलेटचे कर्मचारी उद्धट आहेत. तुम्हाला आलेला अनुभव दुर्दैवी आणि वाईट आहे.