गुजरातमधील अहमदाबादसारख्या शहरांच्या जडणघडणीत मुस्लिम समाजाच्या ऐतिहासिक वास्तूंचा महत्वाचा वाटा राहिलेला आहे. अहमद शहा यांच्या नावावरून नामकरण झालेल्या अहमदाबादसह गुजरातमधील जामनगर, कच्छ, वेलावडार या शहरांतील इस्लामी धर्माची ओळख सांगणा-या ऐतिहासिक वास्तु ‘खुशबू गुजरात की’ या मोहिमेच्या माध्यमातून प्रकाशझोतात येणार आहेत. गेल्या पाच वर्षांपासून गुजरात सरकारच्या पर्यटन विभागाकडून चालवण्यात येणा-या ‘खुशबू गुजरात की’ या मोहिमेद्वारे प्रथमच गुजरातमधील इस्लामी वास्तूंचा मागोवा घेतला जाणार आहे. गुजरात राज्याचे सदिच्छादूत अमिताभ बच्चन या मोहिमेच्या माध्यमातून अहमदाबादमधील सरखेज रोजा आणि जामा मस्जिद या वास्तूंच्या इतिहासाला उजाळा देतील. तसेच एकमताने गुजरात राज्याचे चिन्ह म्हणून मान्यता मिळालेल्या सिद्दी सय्यद मक्क्यातील दगडी खिडकीच्या वैशिष्ट्यांचा या मोहिमेच्या निमित्ताने बनवण्यात येणा-या चित्रपटात आढावा घेण्यात येणार आहे. गुजरातमधील बुद्ध संस्कृतीशी नाते सांगणा-या स्थळांच्या पर्यटनाला प्रोत्साहन दिल्यानंतर पर्यटन विभागाकडून आता अहमदाबादमधील जामा मस्जिद, सरखेजा रोजा यांसारख्या वैभवशाली वास्तूंच्या पर्यटनाला ‘खुशबू गुजरात की’ मोहिमेच्या माध्यमातून चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.