Kuki Woman Dies In Manipur : मे २०२३ मध्ये मणिपूरमध्ये मोठा जातीय हिंसाचार उफाळला होता. मेतैई आणि कुकी या दोन समुदायांमधील सामाजिक संघर्षात अनेकांचे हाकनाक बळी गेले होते. अनेक महिलांवर अतोनात अत्याचार झाले होते. याचदरम्यान, मणिपूरची राजधानी असलेल्या इम्फाळ येथून एका तरुणीचं अपहण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या तरुणीचा आता मृत्यू झाला आहे. जवळपास तीन वर्षे ही तरुणी नैराश्येत होती. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
दोन वर्षांपूर्वी तिच्यावर झालेल्या आघानंतर ती तीव्र धक्क्यातून आणि शारीरिक दुखापतींमधून सावरलीच नाही. यामुळे तिची प्रकृती बिघडत जात होती, असं तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं. मेतैई समाजातील काही पुरुषांनी तिच्यावर अतोनात अत्याचार केले होते. तिला लंगोल येथे नेण्यात आलं. तिथेच तिच्यावर बलात्कार करण्यात आला. नंतर तिला बिष्णूपूरमध्ये सोडून देण्यात आलं. पण या परिस्थितीतूनही ती गंभीर जखमी होऊन बचावली. त्यानंतर तिने २१ जुलै २०२३ मध्ये रितसर तक्रारही दाखल केली.
गंभीर शारीरिक दुखापती, खोल मानसिक आघात
“ती चमत्कारिकरित्या वाचली असली तरी तिला गंभीर शारीरिक दुखापती, खोल मानसिक आघात आणि गर्भाशयाच्या गंभीर गुंतागुंतीचे आजार झाले. तिच्यावर गुवाहाटी येथे उपचार करण्यात आले. परंतु १० जानेवारी २०२६ रोजी तिच्या दुखापतींमुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला”, असे आयटीएलएफने म्हटले आहे.
उत्साही मुलीचं हास्यच हरवलं
महिलेच्या आईने न्यूजलॉन्ड्रीला सांगितले की तिच्या मुलीला गंभीर दुखापतींमुळे श्वास घेण्यास त्रास होत होता. “माझी मुलगी या भयानक क्रूरतेला बळी पडण्यापूर्वी खूप उत्साही आणि मनमिळावू मुलगी होती. तिला शिक्षणात फारसा रस नव्हता, पण ती आमच्या एका नातेवाईकासोबत इम्फाळमधील एका ब्युटी पार्लरमध्ये काम करत होती. तिच्या अनेक मैत्रिणी होत्या आणि ती अनेकदा त्यांच्यासोबत वेळ घालवत असे. माझी मुलगी नेहमीच हसतमुख आणि उत्साही असायची, पण या घटनेनंतर तिचे हास्य हरवले,” असे आई म्हणाली.
वाईट घटनेनंतर तिची सुटका कशी झाली होती?
“त्यांनी माझ्याशी जे काही वाईट वागता येईल ते केले आणि रात्रभर मला काहीही खायला दिले नाही. त्यांनी पाणीही दिले नाही. सकाळी, कसे तरी, वॉशरूमला जाण्याच्या बहाण्याने… मी डोळ्यांवरची पट्टी काढून आजूबाजूला काय आहे आणि काय घडत आहे ते पाहण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मी टेकडीवरून पळून जाण्याचा निर्णय घेतला”, असं तिने माध्यमांना सांगितलं होतं.
एका ऑटोरिक्षा चालकाने तिला सुरक्षित ठिकाणी नेले. ती कांगपोक्पी येथे पोहोचण्यात यशस्वी झाली, जिथे तिला शेजारच्या नागालँडची राजधानी कोहिमा येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले.
