Shelly Kittleson : इराकची राजधानी असलेल्या बगदाद या ठिकाणी मागील आठवड्यात अमेरिकेतील महिला पत्रकार शेली किटलसनचं अपहरण करण्यात आलं होतं. तिची आता सुटका करण्यात आली आहे. मंगळवारी इराकच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. शेली किटलसनला मंगळवारी दुपारी सोडण्यात आलं, सध्या शेली कुठे आहे त्याची माहिती मात्र गोपनीय ठेवण्यात आली आहे.

सात दिवसांपूर्वी शेलीचं अपहरण

सात दिवसांपूर्वी शेली किटलसन या अमेरिकेतल्या पत्रकाराचं अपहरण करण्यात आलं होतं. तिला बगदादमध्ये बंदी बनवून ठेवण्यात आलं होतं. दम्यान इराणचा पाठिंबा असलेल्या इराकी मिलिशिया कताइब हिजबुल्लाने हे निवेदन मंगळवारी जारी केलं की शेलीची सुटका केली जाईल त्यानंतर तिला सोडण्यात आलं. दरम्यान अशा प्रकारची घटना पुन्हा होणार नाही असंही कताइबकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. शेली किटलसनला सात दिवसांपूर्वी रस्त्यावरुन उचलण्यात आलं होतं आणि तिला बंदी बनवण्यात आलं होतं. आता अखेर मंगळवारी तिची सुटका करण्यात आली आहे. मिलिशियाने असंही स्पष्ट केलं आहे की इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी यांनी दिलेल्या निर्णयानंतर ही सुटका करण्यात आली आहे. शेली किटलसनला तातडीने देश सोडावा लागेल असंही सांगण्यात आलं आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने या घटनेबाबत अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

हिजबुल्लाने सुरुवातीला या महिला पत्रकाराच्या अपहराणची जबाबदारी घेतली नव्हती. पण अमेरिका आणि इराकच्या अधिकाऱ्यांना हिजबुल्लावरच संशय होता. दरम्यान नंतर मिलिशियाच्या दोन सदस्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर हे सांगितलं की किटलसनच्या सुटकेनंतर त्यांच्या काही साथीदारांना सोडलं जाणार आहे ज्यांना इराकच्या अधिकाऱ्यांनी आधी अटक केली होती.

कोण आहे शेली किटलसन?

१) ४९ वर्षीय शेली किटलसन ही अमेरिकेतील मुक्त पत्रकार आहे. ती विदेशात राहून काम करत असते.

२) इराक आणि सीरिया या ठिकाणी केलेल्या वार्तांकनामुळे तिची ओळख तयार झाली आहे. रोममध्ये आपला बेस तयार करुन ती काम करते आहे.

३) अपहरणाच्या काही दिवसांपूर्वीच ती इराकला आली होती. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तिच्या सुरक्षेला धोका आहे. तुला इराक सोडावा लागेल, मात्र शेलीने इराक सोडला नाही. ज्यानंतर तिचं अपहरण झालं. ३१ मार्चला शेली किटलसचं अपहरण झालं होतं. तिच्या अपहरणासाठी दोन कार वापरण्यात आल्या होत्या. एका गाडीचा पाठलाग करत असताना किटलसनचं अपहरण करण्यात आलं. तिला दुसऱ्या कारने पळवून नेण्यात आलं. अखेर एक आठवड्याने तिची सुटका करण्यात आली.