Epstein Files Norwegian diplomat Indian slur: अमेरिकेच्या विधी विभागाने लैंगिक प्रकरणातील गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी संबंधित तीन दशलक्ष पानांच्या फाईल्स प्रसिद्ध केल्या आहेत. या फाईल्समधून जगाला हादरवून सोडणारे खुलासे समोर येत आहेत. फाईल्समध्ये केलेल्या दाव्यांच्या सत्यतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात असले तरी, सध्या यातील खुलासे चर्चेच्या विषय ठरत आहेत. जेफ्रीच्या ईमेलमध्ये नॉर्वेजियन राजदूत टेर्जे रोड-लार्सन याने भारतीयांबद्दल अपमानजनक टिप्पणी केल्याचे उघडकीस आले आहे.

लार्सन यांचे आक्षेपार्ह उत्तर

विधी विभागाने प्रसिद्ध केलेल्या फाईलनुसार, माजी फायनान्सरने भारतीय राजकारणी व्यक्तीचा ईमेल रोड-लार्सनला फॉरवर्ड केला, तेव्हा त्याने जेफ्री एपस्टीन यांच्याशी बोलताना भारतीयांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. रोड-लार्सनने २५ डिसेंबर २०१५ रोजी जेफ्री एपस्टीनला पाठवलेल्या ईमेलला उत्तर दिले आहे. त्यात “तुम्ही ही म्हण ऐकली आहे का? जेव्हा तुमचा सामना एखादा भारतीय व्यक्ती आणि सापाशी होतो, तेव्हा आधी भारतीय व्यक्तीला ठार करा!” असे लार्सन यांनी लिहले आहे.

हा संवाद समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “ते भारतीयांचा द्वेष करतात”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

टेर्जे रोड-लार्सन कोण आहेत?

नॉर्वेजियन राजदूत टेर्जे रोड-लार्सन प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय शांतता संस्थेचे अध्यक्ष होते. २०२० मध्ये त्यांचा जेफ्री एपस्टीनशी संबंध असल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. लार्सन संयुक्त राष्ट्रांचे राजदूत देखील होते.

एपस्टीन फाईल्समध्ये मोदींचा उल्लेख

जेफ्री एपस्टीन फाईल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख आल्याचा दावा केला जात आहे. हा दावा देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळून लावला आहे. हा उल्लेख म्हणजे ‘एका दोषी सिद्ध झालेल्या गुन्हेगाराची निरर्थक बडबड’ असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. या आरोपांकडे तुच्छतेने पाहणेच योग्य ठरेल, असेही मंत्रालयाने म्हटलंय.

जेफ्री एपस्टीन प्रकरण नेमकं काय?

जेफ्री एपस्टीन हा धनाढ्य गुंतवणूकदार होता. अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी लैंगिक छळाचे आरोप केल्यानंतर, २००५ मध्ये सर्वप्रथम त्याच्याविरुद्ध चौकशी सुरु झाली. २००६ मध्ये त्याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीसोबत अनेक वेळा लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला. नंतर हे प्रकरण ग्रँड ज्युरीकडे पाठवण्यात आले. २००७ मध्ये फेडरल अभियोक्त्यांनी एपस्टीनविरुद्ध आरोपपत्र दाखल केले.

१८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप त्यावर ठेवण्यात आला. २००८ मध्ये त्याने हा गुन्हा कबूल केल्यानंतर त्याला १८ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली, परंतु २००९ मध्ये त्याची सुटका झाली. कालांतराने अशी अनेक प्रकरणं उघडकीस आली. २०१८ – १९ याकाळात समोर आलेल्या विविध लैंगिक छळाच्या आरोपाखाली त्याला पुन्हा अटक करण्यात आली. २०१९ मध्ये न्यूयॉर्क शहरातील फेडरल तुरुंगात असताना जेफ्रीने आत्महत्या केली.