Kim Jong Un Successor Kim Ju Ae: उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनचा उत्तराधिकारी कोण होणार याबाबत चर्चा होऊ लागली आहे. किम जोंग यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्व जगाचे लक्षा लागले आहे. अशात दक्षिण कोरियाची राष्ट्रीय गुप्तहेर संस्थेने एक मोठा दावा केला आहे. किम जोंग उनची किशोरवयीन मुलगी किम जु ए (Kim Ju Ae) हिलाच उत्तर कोरियाची वारसदार म्हणून पाहिले जात असल्याचे ‘एनआयएस’ने म्हटले आहे.

दक्षिण कोरिया गुप्तहेर संस्थेचा दावा

दक्षिण कोरियाची राष्ट्रीय गुप्तहेर संस्थेची (NIS) एक गोपनीय बैठक पार पडली. NIS चे संचालक ली जोंग-सेओक यांनी दक्षिण कोरियाच्या संसदेत याबाबत माहिती दिल्याचे सांगितले जाते. “किम जोंग उन यांच्यानंतर त्यांची मुलगीच सत्ता हाती घेईल, हे आता स्पष्ट होत चालले आहे”, असे जोंग-सेओक म्हणाले. यासाठी त्यांनी काही ‘गुप्तचर माहिती’ सादर केली.

सार्वजनिक ठिकाणी उपस्थिती

किम जोंग यांची मुलगी किम जु ए २०२२ च्या उत्तरार्धापासून वडिलांसोबत अनेक महत्त्वाच्या सरकारी आणि लष्करी कार्यक्रमांमध्ये वारंवार दिसत आहे. उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी तिचा उल्लेख किमचे सर्वात प्रिय अपत्य असा केला आहे. हे तिला भविष्यातील नेतृत्वासाठी तयार केले जात असल्याचे संकेत असल्याचे दक्षिण कोरियाने म्हटले आहे. किम जु ए हिला लष्करी कार्यक्रमांमध्ये विशेष स्थान दिले जात आहे. तिने अलीकडेच लष्करी प्रशिक्षणादरम्यान टँक चालवला आणि एका शस्त्रास्त्र कारखान्याला भेट दिली होती.

एवढ्या लवकर उत्तराधिकारी होणे अवघड

किम जु एचा गेल्या काही वर्षात सार्वजनिक क्षेत्रात वाढलेला वावर आणि महत्वाच्या ठिकाणी असलेली उपस्थिती तिची उत्तराधिकारी म्हणून प्रतिमा तयार करण्यासाठी जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न मानला जात आहे, असे दक्षिण कोरियाची राष्ट्रीय गुप्तहेर संस्थेने म्हटले आहे. पण, उत्तर कोरियातील पुरुषप्रधान व्यवस्थेत एका महिलेकडे सत्ता सोपवली जाईल का? अशी शंका काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसेच, किम जोंग उन सध्या ४२ वयाचे आहेत, त्यामुळे इतक्या लवकर उत्तराधिकारी जाहीर करणे त्यांच्या स्वतःच्या सत्तेसाठी धोक्याचे ठरू शकते, असेही काही निरीक्षकांचे मत आहे.

१९४८ पासून किम कुटुंबाची सत्ता

उत्तर कोरियावर १९४८ पासून किम कुटुंबाची सत्ता आहे. आतापर्यंत तीन पिढ्यांनी राज्य केले आहे:
१) किम इल सुंग (संस्थापक)
२) किम जोंग इल (पुत्र)
३) किम जोंग उन (नातू)
आता जर किम जु ए सत्तेवर आली, तर ती या कुटुंबातील चौथ्या पिढीची प्रतिनिधी आणि पहिली महिला राज्यकर्ती ठरेल.