King Charles ब्रिटनच्या राजघराण्याचे सदस्य आणि किंग चार्ल्स यांचे बंधू प्रिन्स अँड्र्यूंना अटक करण्यात आली आहे. माजी प्रिन्स अँड्र्यू यांनी सार्वजनिक पदावर असताना गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून या प्रकरणी यूके पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या संदर्भात आता किंग चार्ल्स यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

किंग चार्ल्स तृतीय यांची भावाच्या अटकेबाबत प्रतिक्रिया काय?

ब्रिटनचे किंग चार्ल्स यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ब्रिटनचे किंग चार्ल्स तृतीय यांच्याकडून एक निवेदन पोस्ट केलं आहे, त्यात लिहिलं आहे की, अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर यांच्याबद्दलच्या बातम्या आणि सार्वजनिक पदाचा गैरवापर केल्याचा संशय याबाबत मला खूप चिंता वाटते. आता यापुढची प्रक्रिया म्हणजे या प्रकरणाची योग्य पद्धतीने आणि योग्य अधिकाऱ्यांकडून पूर्ण आणि निष्पक्ष चौकशी होईल. या चौकशीमध्ये मी आधी म्हटल्याप्रमाणे, आमचा पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य राहील. मी स्पष्ट करु इच्छितो की जी कायदेशीर कारवाई आहे ती केली गेली पाहिजे. ही प्रक्रिया सुरू असताना, या विषयावर अधिक भाष्य करणे माझ्यासाठी योग्य ठरणार नाही. अशी प्रतिक्रिया किंग चार्ल्स तृतीय यांनी दिली आहे.

शाही उपाधी आधीच काढली गेली आहे

माजी प्रिन्स अँड्र्यू यांच्याकडून त्यांच्या शाही उपाधी आधीच काढल्या गेल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकाप्रमाणेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येते आहे. मागील सात वर्षांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर त्यांची प्रिन्स ही उपाधी हटवण्यात आली होती. त्यावेळी त्यांना त्यांना शाही राजमहालही सोडावा लागला. प्रिन्स अँड्र्यू हे गेल्या काही काळापासून जगाशी फार संपर्कात नव्हते. जास्त घराबाहेरही पडत नव्हते. आता त्यांना अटक केल्यानंतर प्रिन्स चार्ल्स तृतीय यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. कायदेशीर मार्गाने ज्या गोष्टी होत आहेत त्या झाल्या पाहिजेत आम्ही त्यात पडणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. “प्रिन्स अँड्र्यू हे आता फक्त अँड्र्यू माउंटबॅटन विंडसर म्हणून ओळखले जातील, म्हणजे ते आता राजकुमार राहिले नाहीत. तसेच ते आता त्यांच्या पर्यायी खासगी निवासस्थानात जातील आणि त्यांना त्या ठिकाणी त्यांना कायदेशीर संरक्षण दिलं जाईल”, असं निवेदनात म्हटलं होतं.

पोलिसांनी काय निवेदन दिलं आहे?

“तपासाचा भाग म्हणून, आम्ही आज सार्वजनिक पदावर असताना गैरवर्तन केल्याच्या संशयावरून (19/2) नॉरफोकमधून साठीतील एका व्यक्तीला अटक केली आहे. तसेच बर्कशायर आणि नॉरफोकमधील पत्त्यांवर देखील शोध घेण्यात येत आहे. ती व्यक्ती सध्या पोलीस कोठडीत आहे. राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आम्ही अटक केलेल्या व्यक्तीचे नाव जाहीर करणार नाही. कृपया हे देखील लक्षात ठेवा की हा खटला अजूनही सक्रिय आहे, म्हणून न्यायालयाचा अवमान टाळण्यासाठी कोणतेही प्रकाशन सावधगिरीने केले पाहिजे.” असं पोलिसांनी म्हटलं आहे.