King Charles USA Visit 2026: किंग चार्ल्स सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. व्हाईट हाऊसमध्ये किंग चार्ल्स यांच्यासाठी विशेष मेजवानी ठेवण्यात आली होती. यावेळी बोलताना चार्ल्स यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना चांगल्याच कोपरखळ्या मारल्या. ब्रिटन नसते तर अमेरिकन नागरिक आज फ्रेंच भाषेत बोलत असते, असा मिश्किल टोला त्यांनी लगावला. यावेळी चार्ल्स यांनी युरोपच्या अमेरिकेवरील अवलंबित्वाबाबत ट्रम्प यांनी केलेल्या जुन्या विधानाचा संदर्भ दिला.

किंग चार्ल्स यांच्या ट्रम्पना कोपरखळ्या

​”मिस्टर प्रेसिडेंट, आपण अलीकडेच म्हणाला होता की अमेरिका नसती तर युरोपीय देश जर्मन भाषेत बोलत असते. पण मी असे धाडस करून म्हणेन की, जर आम्ही नसतो तर तुम्ही कदाचित फ्रेंच बोलत असता,” असे किंग चार्ल्स म्हणाले. चार्ल्स यांनी व्हाईट हाऊसच्या ‘ईस्ट विंग’मध्ये केलेल्या बदलांवरही यावेळी विनोद केला. “ब्रिटिशांनी देखील १८१४ मध्ये या व्हाईट हाऊसच्या पुनर्विकासाचा एक प्रयत्न केला होता”, असे सांगताना खेद वाटत असल्याचे चार्ल्स यावेळी बोलताना म्हणाले. मेजवाणीचे वर्णन चार्ल्स यांनी बोस्टन टी पार्टी पेक्षा चांगली सुधारणा असल्याचे नमूद केले.

मित्रराष्ट्रांशी संबंध टिकवून ठेवण्याचे आवाहन

दुसरीकडे किंग चार्ल्स यांनी संसदेत केलेल्या भाषणाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी कौतुक केले. काँग्रेसमध्ये दिलेल्या भाषणाबद्दल मी चार्ल्स यांचे अभिनंदन करतो. त्यांनी चक्क डेमोक्रॅट्सना उभे राहायला लावले, जे मला कधीच जमले नाही,” असे मिश्किलपणे ट्रम्प म्हणाले. तर, चार्ल्स यांनी संसदेत केलेल्या भाषणात अमेरिकेला मित्रराष्ट्रांशी असलेले संबंध टिकवून ठेवण्याचे आवाहन केले. चार्ल्स यांनी १९४४ मध्ये कार्यान्वित झालेल्या एचएमएस ट्रम्प या ब्रिटीश पाणबुडीची घंटा ट्रम्प यांना भेट म्हणून दिली.

चार्ल्स यांचा अमेरिका दौरा

किंग चार्ल्स यांचा अमेरिका दौरा सध्या चांगलाच चर्चेत आहे. इराणबरोबर तीव्र संघर्ष सुरु असताना चार्ल्स यांच्या अमेरिका भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. चार्ल्स यांच्या या दौऱ्याला मोठे राजनैतिक महत्त्वही दिले जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील किंग चार्ल्स यांच्याशी निगडीत अनेक विधाने केली आहेत. “माझ्या आईचे सिक्रेट क्रश किंग चार्ल्स होते”, असे ट्रम्प म्हणाले आहेत. दरम्यान, किंग चार्ल्स यांनी विनोदी शैलीत हलक्या फुलक्या अंदाजात केलेली वक्तव्यं चांगलेच चर्चेत आली आहेत.