युरोपियन संसदेत सध्या एका पुतळ्याची चर्चा रंगली आहे. हा पुतळा दुसऱ्या तिसऱ्या कुणाचाही नाही, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आहे. साधारण साडेआठ फूट उंची असलेला डोनाल्ड ट्रम्प यांचा सोनेरी पुतळा विवस्त्र आहे. २३ कॅरेट सोन्याचा मुलामा यावर देण्यात आला आहे. तसंच अन्यायाचा सम्राट असं नाव देऊन हा पुतळा पबसवण्यात आला आहे. आपण जाणून घेऊ हे प्रकरण नेमकं आहे तरी काय?
नेमकं विविस्त्र पुतळ्याचं प्रकरण काय?
डॅनिश कलाकार जेन्स गाल्शियॉट यांनी या पुतळ्याबाबत सांगितलं की डोनाल्ड ट्रम्प यांना सोनं फारच आवडतं त्यामुळे हा पुतळा त्यांना नक्की आवडेल असा उपरोधिक टोला जेन्स यांनी लगावला आहे. हा पुतळा एका सामान्य माणसाच्या खांद्यावर बसला आहे असं दाखवण्यात आलं आहे. फ्रान्स येथील स्ट्रासबर्ग हे युरोपियन संसदेचं मुख्यालय आहे. याच ठिकाणी हा सोनेरी पुतळा बसवण्यात आला आहे. तसंच या पुतळ्याच्या खाली जो चौथरा आहे त्यावर ऑरेंज प्लेग असंही संबोधण्यात आहे. एवढंच नाही तर किंग ऑफ इनजस्टिस अर्थात अन्यायाचा सम्राट असंही या पुतळ्याला संबोधण्यात आलं आहे. डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या तुलनेने खूपच अशक्त असलेल्या माणसाच्या खांद्यावर बसले आहेत. त्यांच्या मांड्या आणि त्यांचं पोट यामुळे तो माणूस पार पिचला आहे असे या पुतळ्यावरचे भाव आहेत. पुतळ्याच्या चौथऱ्यावर असं लिहिलं आहे की मी सामान्य माणसाच्या पाठीवर बसलो आहे, माझ्या ओझ्याखाली तो बुडत चालला आहे. त्याला मदत करण्यासाठी मी काहीही करू शकतो, पण मी त्याच्या खांद्यांवरून उतरणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचा हा पुतळा उपरोध म्हणून या ठिकाणी बसवण्यात आला आहे. CNN ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
जेन्स गाल्शियॉट नेमकं काय काय म्हणाले?
हा पुतळा का बसवण्यात आला आहे? असं विचारलं असता जेन्स गाल्शियॉट म्हणाले, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पर्यावरण आणि जागतिक व्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. त्याचं प्रतीक म्हणूनच हा अशा विवस्त्र पुतळा बसवण्यात आला आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प यांचा भर सगळं काही नष्ट करण्यावरच आहे. युरोपियन युनियनने निषेध म्हणून हा पुतळा बसवला असेल असं नाही. उलट डॅनिश राजकारणी पेर क्लॉसन यांना उपरोध म्हणून ही कलाकृती तयार करून घेतली आहे. युरोपियन संसदेच्या सदस्यांना संसदेच्या परिसरात आंदोलनं, निदर्शनं आयोजित करण्याचा अधिकार आहे, त्यासाठी त्यांना पूर्वसंमती घ्यावी लागते. त्यानुसारच हा पुतळा या ठिकाणी बसवण्यात आला आहे आहे जेन्स यांनी सांगितलं. या पुतळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
