सा-या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या स्कॉटलंड हा इंग्लंडपासून वेगळा होणार का या प्रश्नाचा निकाल अखेर लागला आणि जनतेने अखंड ग्रेट ब्रिटनच्या बाजूनेच कौल दिला. हा जनमताचा कौल अनेक अर्थांनी महत्त्वाचा असून त्याचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. आमचा पुरेसा विकास होत नाही, आम्हाला पुरेशी साधन-संपत्ती दिली जात नाही आणि वेस्ट मिनस्टरकडून आमच्यावर सातत्याने अन्यायच होतो ही सबब देत आम्हाला वेगळे व्हायचे आहे, अशी स्कॉटलंडवासीयंची मागणी होती. गेल्या दोन वर्षांपासून या मागणीवर निर्णायक निकाल देण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, ती आज संपली आणि ग्रेट ब्रिटनचे विभाजन होणार नाही, हे स्पष्ट झाले. त्या देशाला काही प्रमाणात आर्थिक उन्नत्ती देणारी साधन संपत्ती केंद्रे स्कॉटलंडमझील उत्तर समुद्रात असल्यामुळे ते एक कारण स्कॉटलंड वासीयांना स्वतंत्र होण्याची मागणी करण्यासाठी मिळाले होते. तसेच ग्रेट ब्रिटनला लागणारे खनिज तेल, हेदेखिल स्कॉटलंड परिसरातूनच येते, त्यामुळे विकासाची साधने आमची आणि प्रत्यक्ष विकास मात्र अन्य प्रांतांचा ही स्कॉटलंडवासीयांची तक्रार होती. परंतु जनमताचा कौल एकंदर शहाणपणाने लागल्यामुळे या तक्रारीकडे बहुसंख्यांनी फारशा गांभिर्याने पाहिले नाही. ही बाब महत्ताची. कारण तो देश दुभागला असता तर आर्थिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणावर खचला असता आणि त्याचा फटका जागतिक अर्थव्यवस्थेस आणि त्याच्याही आधी भारतास बसला असता.
स्वातंत्र्याच्या बाजूने कौल गेला असता तर इंग्लंड आणि स्कॉटलंड यांच्यात पुढील पंधरा महिन्यात संपत्ती विभाजनाची प्रकिया पूर्ण करण्याचे बंधन होते. तसे झाले असते तर ब्रिटनमध्ये असलेल्या त्या देशांच्या आणि अन्य काही बॅंकांना मोठे नुकसान सहन करावे लगाले असते. हे आता टळले. त्याचप्रमाणे स्कॉटलंड विलग झाले असते तर युरेपीयन समुदायाला मोठे आर्थिक खिंडार पडले असते आणि सध्या नाजूक असलेली युरोपची अर्थव्य़वस्था अधिकच रसातळाला गेली असती.
या निकालापासून भारताने शिकावे असे बरेच काही आहे. देशाच्या कानोकोप-यात विकासाची गंगा पोहचली नाही तर त्या परिसरातील जनतेला वेगळे व्हावेसे वाटते हा यातील महत्त्वाचा धडा. भारतात अशी परिस्थिती मोठ्या प्रमाणावर असून विलगीकरणाची मागणी काही प्रांतांकडून होऊ नये असे आपल्याला वाटत असेल तर समान आर्थिक विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचे ठरेल.
स्कॉटलंड वेगळे व्हावे, अशी मागणी करणा-या प्राधान्याने त्या परिसरात स्थायिक झालेले बिगर स्कॉटिश निगरिक होते, ही बाब अत्यंत उल्लेखनीय. याचा अर्थ परप्रांतातून विस्थापित म्हणून आलेल्यांना नव्या कर्मभूमीशी इतके ममत्त्व असतेच असे नव्हे. हे या निकालावरून दिसून आले. याचा संबंध पुन्हा विकासाशीच असतो. तेव्हा या दोन्हीचा धडा आपण घेतलेला बरा. स्कॉटलंडमधील निकालाचा हा अर्थ.