चार दिवसांपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेल्या माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून घोषित केले आहे. रात्री उशिरापर्यंत झालेल्या भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर बेदी यांच्या नावाची घोषणा पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी केली. विशेष म्हणजे बेदी यांना मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार घोषीत करण्यावरून बैठकीत एकमत झाले नाही.
 रामलीला मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्याच सभेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने बेदींच्या अटी मान्य करून त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला होता. त्यामुळे बेदी यांच्या नावाची घोषणा भाजपला करावी लागली. बेदी यांच्या नावाची घोषणा केल्याने भाजपला दिल्लीत बंडाळीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच भाजपने मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा करून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा एकप्रकारे ‘मोदी लाट’ ओसरल्याचा परिणाम मानला जात आहे.
 दिल्लीसारख्या राज्यात भाजपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आयात करावा लागल्याने भाजप कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.   बेदी यांनी पक्षात प्रवेश केला आहे, त्या पक्षाच्या कार्यकर्त्यां आहेत आणि त्याच पद्धतीने त्यांचे वर्तन हवे, असे खासदार मनोज तिवारी यांनी सांगत नाराजी प्रकट केली.

तीरथ भाजपमध्ये
 माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेत्या कृष्णा तीरथ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपकडे कार्यकर्ते नसल्याने त्यांना इतर पक्षातून उमेदवार आयात करावे लागत असल्याचा आरोप काँग्रेसचे  प्रचारप्रमुख अजय माकन यांनी केला.