केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशातील नदीत उडी घेत पोहतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओवरून त्यांनी स्वतःला “मैं यहाँ का खिलाड़ी हूँ” (मी इथला ‘खिलाडी’ आहे) असे म्हटले होते. आता दिल्लीतील मुसळधार पावसानंतर संसद परिसरात पाणी साचल्याचा व्हिडिओ शेअर करत काँग्रेसने रिजिजू यांच्यावर टीका केली आहे. याबद्दल सविस्तर वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. काँग्रेसच्या केरळ युनिटने बुधवारी संसद परिसरात पाणी साचल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत “यहाँ के खिलाडी किरेन रिजिजू, वन मोर रील प्लीज”, अशी उपरोधिक टिप्पणी केली.

नवीन संसद भवनाचे ‘इनडोअर वॉटर पार्क’

काँग्रेसने या पोस्टमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. मोदींच्या काटकसरीच्या धोरणांमुळे नवीन संसद भवनाचे ‘इनडोअर वॉटर पार्क’मध्ये रूपांतर झाले असून, मंत्र्यांना रील बनवण्यासाठी अरुणाचल प्रदेशात जाण्याची गरज नाही, असा टोला काँग्रेसने लगावला.

मात्र केरळ काँग्रेसने शेअर केलेला व्हिडीओ नेमका कुठला, याची माहिती मिळू शकलेली नाही. हा संसदेचा व्हिडीओ असल्याचा त्यांचा दावा आहे.

“करदात्यांचे पैसे खर्च करून अरुणाचलला जाण्याची गरज नाही; मंत्री आता संसदेतच पोहण्याच्या आणि डायव्हिंगच्या व्हायरल रील्स बनवू शकतात,” अशी टीका काँग्रेसने केली. पंतप्रधान मोदींनी नुकतेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मंत्र्यांना सोशल मीडिया आणि रील्सच्या माध्यमातून ‘जेन झी’ मतदारांपर्यंत पोहोचण्यावर लक्ष देण्यास सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने टीका केल्याचे दिसते.

रिजिजूंचा नदीत पोहतानाचा व्हिडिओ

२३ ऑगस्ट रोजी रिजिजू यांनी अरुणाचल प्रदेशातील नदीत पोहतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. व्हिडिओमध्ये ते नदीत उडी मारताना आणि पोहण्याच्या विविध पद्धती दाखवताना दिसत होते.

“पोहता येत नसेल तर खोल पाण्यात कधीही जाऊ नका. नदीत अनेक जण बुडाले आहेत. अरुणाचल प्रदेशातील नद्या मोठ्या आणि अतिशय खोल आहेत,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला होता. या व्हिडिओला ३.५ लाख व्ह्यूज मिळाल्यानंतर रिजिजू यांनी त्याच पोस्टमध्ये अरुणाचलच्या वेगवान नद्यांमध्ये पोहणे सामान्य जलतरण तलाव किंवा यमुना नदीत पोहण्यापेक्षा वेगळे असल्याचे सांगितले.

“वेगवान नदीत डोके वर आणि शरीर अधिक उभ्या स्थितीत ठेवावे लागते. मी इथला खिलाडी आहे,” असे त्यांनी म्हटले होते. याच वक्तव्याचा संदर्भ घेत काँग्रेसने संसद परिसरातील पाणी साचल्याच्या मुद्द्यावरून रिजिजूंवर टीका केली आहे.