Kiren Rijiju Rahul Gandhi Election Commission Protest: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीच्या खासदारांनी मंगळवारी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या दिशेने मोर्चा काढला. पोलिसांनी मोर्चा रोखल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांनी आकाशवाणी भवन परिसरात आंदोलन सुरू ठेवले. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. याबद्दल सविस्तर वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
रिजिजूंची राहुल गांधींवर टीका
रिजिजू म्हणाले की, “देश बदलला आहे. केवळ एका विशिष्ट कुटुंबात जन्म घेतल्याने तुम्ही पंतप्रधान व्हाल, असे नाही.” देशातील तरुणांची विचारसरणी बदलली असून २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या दिशेने ते काम करत असल्याचेही त्यांनी म्हटले.
काँग्रेसने देशाविरुद्ध काम करणाऱ्या घटकांकडून पसरवल्या जाणाऱ्या कथानकांना बळ देऊ नये, असा आरोप रिजिजूंनी केला. निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय आणि घटनात्मक संस्थांवर वारंवार प्रश्न उपस्थित करण्याऐवजी काँग्रेसने जनतेची सेवा करण्यावर भर द्यावा, असे ते म्हणाले. रिजिजूंनी राहुल गांधींना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून निःस्वार्थपणे जनसेवा शिकण्याचा उपरोधिक टोलाही लगावला आहे.
राहुल गांधी बॅरिकेडवर चढले, तिरंगा फडकावला
दरम्यान, इंडिया आघाडीचा संसद ते निवडणूक आयोग मोर्चा पोलिसांनी रोखल्यानंतर अनेक विरोधी खासदारांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी राहुल गांधी बॅरिकेडवर चढले आणि त्यांनी तिरंगा फडकावला. त्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आकाशवाणी भवन परिसरात गेले आणि तेथे आंदोलन सुरू ठेवले.
नवी दिल्लीत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसदेपासून भारतीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत मोर्चाची सुरुवात केली. ‘एसआयआर’ आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांकडून हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
‘लोकशाही वाचवण्यासाठी आंदोलन’
आकाशवाणी भवन परिसरातून राहुल गांधी यांनी आपण लोकशाही वाचवण्यासाठी आंदोलन करत असल्याचे म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आरएसएस प्रमुख मोहन भागवत आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मतांची चोरी करून देशातील लोकशाही संपवून टाकली, असा आरोपही त्यांनी केला.
दुसरीकडे, भाजपाने हे आरोप फेटाळून लावत, निवडणूक आयोगासारख्या महत्त्वाच्या आणि घटनात्मक संस्थेवर दबाव आणण्याचा विरोधक प्रयत्न करत आहेत, असा आरोप केला आहे.
