Kiren Rijiju Denies China Incursion: अरुणाचल प्रदेशात चीनने घुसखोरी करुन ६० किलो मीटर लांबीचा रस्ता तयार केल्याचा दावा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावला आहे. दरम्यान, अरुणाचल प्रदेश लगतच्या सीमाभागात सीमा रेखांकित करण्याशी निगडीत समस्या असल्याचे रिजिजू यांनी मान्य केले आहे. सीमाभागात राहणाऱ्या गावकऱ्यांचा समस्या वैध असल्याचे सांगताना चिनी सैन्यांनी भारताच्या भूभागात घुसखोरी केल्याचे दावे खोटे असल्याचे रिजिजू यांनी स्पष्ट केले.

किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केली भूमिका

“चीनने भारताच्या भूभागात ६० किलोमीटर आतपर्यंत घुसखोरी केल्याचा दावा करत आहेत आणि विविध बदनामी करणारे व्हिडीओ शेअर करत आहेत ते दावे खोटे आहेत. सीमेवर समस्या आहे. अरुणाचल प्रदेशमधील काही गावकऱ्यांनी सीमेशी निगडीत काही समस्या उपस्थित केल्या आहेत. आणि सीमा रेखांकित केल्या नसल्याने गावकऱ्यांचा समस्या वाजवी आहेत”, मंत्री किरेन रिजिजू यांनी आयएएनएस या वृत्त संस्थेशी संवाद साधताना सांगितले. सीमांकन केले नसल्याने काही भूभागावर चीनकडून दावा केला जात असल्याचेही रिजिजू यावेळी म्हणाले.

रिजिजू काय म्हणाले?

“असं नाही की ते (चीन) आले आणि त्यांनी गावावर ताबा मिळवला. असं नाहीये. काही भूभागावर त्यांचा डोळा आहे कारण त्या भागात सीमांकन केलेले नाही. आमच्या लोकांचा असा विश्वास आहे की आमची जमीन आणखी पुढे आहे, तर चीनच्या बाजूला वसलेल्या गावांतील, ज्यात तिबेटी आणि स्थानिक लोकांचा समावेश आहे, असा दावा करतात की त्यांची भूमी इथून खूप आतपर्यंत पसरलेली आहे. इथं मूळ समस्या आहे”, असे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले.

दावे खोटे

“चीनने ६० किलो मीटर आतपर्यंत भारतीय भूभागात घुसखोरी केल्याचा दावा करणे, त्यासंबंधित बांगलादेश आणि इतर ठिकाणांहून आलेले बनावट फोटो शेअर करणे तसेच, चिनी आर्मीने अरुणाचलमध्ये घुसखोरी केल्याचा दावा करणे चुकीचे आहे. यामुळे सीमेवर असणाऱ्या जवानांचे मनोबल खच्चीकरण होते आणि देशात देखील संभ्रम निर्माण होते, हे योग्य नाही”, असे किरेन रिजिजू म्हणाले. दरम्यान सीमाभागात सुरक्षा वाढवली असल्याची माहिती रिजिजू यांनी दिली. आर्मी आणि इंडो-तिबेटीयन पोलिसांकडून सीमाभागात पेट्रोलिंग केले जात असल्याचेही रिजिजू म्हणाले.

२७ ठिकाणांना नावे

चीनकडून अरुणाचल प्रदेशमधील काही भाग आणि गावांना स्वत:ची नावे देण्याचा प्रयत्न होत आहे. याला प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने २७ ठिकाणं निश्चित करुन त्यांना योग्य नावं देण्याचा आणि नकाशावर देखील समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने नेहमीच अरुणाचल प्रदेश देशाचा अविभाज्य भाग असल्याचे स्पष्ट केले आहे.