Kiren Rijiju Dimagi Naxals List : सशस्त्र नक्षलवाद्यांचा खात्मा झालेला असला तरीही दिमागी नक्षलवादी आजही आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरील भाषणात म्हणाले. यावरून काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिलं. या प्रत्युत्तराला केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांचा माओवादी मानसिकतेचे लोक असा उल्लेख केलेला नाही, असं ते म्हणाले.

एक्सवरील एका पोस्टमध्ये संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केलं की, “दिमागी नक्षल (वैचारिक नक्षलवादी) हा शब्द केवळ अशा लोकांसाठी वापरला गेला आहे जे माओवाद्यांचे समर्थन करतात आणि भारतीय संविधान नाकारतात, जे फुटीरतावाद्यांच्या पाठीशी उभे राहतात आणि कलम ३७० चं समर्थन करतात. तसंच, भारताच्या ईशान्य राज्यांना देशाच्या उर्वरित भागापासून वेगळं करण्यासाठी चिकन नेक तोडण्याची भाषा करणाऱ्यांचा यात समावेश होतो, असंही रिजिजू म्हणाले.

किरेन रिजिजू काय म्हणाले?

सिलिगरी कॉरिडॉर ही पश्चिम बंगालमधील २२ किमी रुंद जमिनीची अरुंद पट्टी आहे जी ईशान्य भारताला जोडते. रिजिजू यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी नेत्यांना दिमागी नक्षल म्हटलेलं नाही. फक्त खालील लोकच दिमागी नक्षल आहेत:

१. जे माओवाद्यांना पाठिंबा देतात आणि भारतीय संविधान नाकारतात.
२. जे फुटीरतावाद्यांसोबत उभे राहतात आणि कलम ३७० चं समर्थन करतात.
३. ज्यांना ईशान्य भारताला देशापासून वेगळं करण्यासाठी चिकन नेक तोडायचा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

सशस्त्र नक्षलवादाचं देशातून जवळपास उच्चाटन झालं आहे. मात्र नक्षलवादी विचारसरणीचा प्रभाव अजूनही सार्वजनिक जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये आणि संस्थांमध्ये टिकून आहे. अशा दिमागी नक्षली प्रवृत्ती ओळखून त्यांना एकटं पाडण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. अशा प्रवृत्ती हिंसाचाराला प्रोत्साहन देण्याचं, देशाला चुकीच्या दिशेने नेण्याचे प्रयत्न करू शकतात. देशाच्या विकासासाठी तरुणांनी या विचारसरणीपासून दूर राहिलं पाहिजे, असं मोदी म्हणाले. सार्वजनिक क्षेत्रांमध्ये दीर्घकाळ माओवादी विचारसरणीच्या व्यक्तींचा प्रभाव राहिला. सरकारी समित्या आणि विविध संस्था तसेच उपक्रमांवरही या विचारसरणीचा प्रभाव असल्याचं त्यांनी नमूद केलं.

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यावर माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम म्हणाले, “मी दिमागी नक्षल असल्याचा मला अभिमान आहे.”