केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मागील काही दिवसांपासून देशभरात आंदोलन सुरू आहे. निवडणूक आयोगाच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या एसआयआर प्रक्रियेच्या विरोधात आणि ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टी आणि इंडिया आघाडीच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत मोठ्या घडामोडी सुरू आहेत.

कॉक्रोच जनता पार्टीच्या सर्वच आंदोलनाला अभिनेते प्रकाश राज हे सुरुवातीपासून पाठिंबा देताना दिसून आले आहेत. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे आंदोलन असो किंवा आता ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलन असो. प्रकाश राज हे कॉक्रोच जनता पार्टीला खंबीर साथ देताना दिसत आहेत. आता प्रकाश राज यांच्या एका वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरून प्रकाश राज यांच्यावर टीका होताना पाहायला मिळत आहे.

कॉक्रोच जनता पार्टीच्या एका पत्रकार परिषदेदरम्यान महिला पोलिसांबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना प्रकाश राज यांनी ‘हा एक चांगला विनोद होता’, अशी प्रतिक्रिया दिली. मात्र, यावरून प्रकाश राज यांच्यावर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू हे चांगलेच संतापले आहेत. रिजिजू यांनी प्रकाश राज यांचा हा व्हिडीओ शेअर करत त्यांना थेट ‘दिमागी नक्षल’ असं म्हटलं आहे.

व्हिडीओ काय आहे आणि रिजिजू काय म्हणाले?

सोशल मीडियावर सध्या प्रकाश राज यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मागील काही दिवसांत झालेल्या एका पत्रकार परिषदेतील असल्याचं बोललं जात आहे. या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने प्रकाश राज यांना विचारलं की, ‘तुमच्यावर असा आरोप केला जात आहे की तुम्ही आणि इतर काही लोक आंदोलनादरम्यान महिला पोलीस अधिकाऱ्यांना त्रास देत आहात. यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे?’ पत्रकाराने हा प्रश्न विचारताच प्रकाश राज हे मोठ्याने हसल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

त्यानंतर या प्रश्नावर उत्तर देताना प्रकाश राज यांनी म्हटलं की, “हा एक चांगला विनोद होता, खूपच चांगला.” दरम्यान, आता प्रकाश राज यांचा हा व्हिडीओ केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी एक्सवर (ट्विटर) शेअर करत त्यांना ‘दिमागी नक्षल’ असं म्हटलं आहे. रिजिजू म्हणाले की, “ही आपली भारतीय संस्कृती नाहीये. हा निर्लज्ज खलनायक कोण आहे? हे दिमागी नक्षल लोक भारतीय संस्कृतीला नष्ट करत आहेत”, अशा शब्दांत रिजिजू यांनी टीका केली आहे.