अरुणाचल प्रदेशातील एका चिमुकलीचा ‘हमको इंडियन बोलो’ म्हणतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी तिच्याशी व्हिडिओ कॉलवरून संवाद साधला. ‘चिनी’ म्हणून संबोधल्याने नाराज झालेल्या या मुलीचे नाव टिंकल असल्याचे समोर आले आहे.

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान रिजिजू यांना टिंकलची ओळख करून देण्यात आली. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झाल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी तिच्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली आणि व्हिडिओ कॉलवर तिच्याशी संवाद साधला.

रिजिजू यांनी टिंकलशी हिंदीतून संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तिच्या आई-वडिलांबद्दल विचारले. “तुझी आई कुठे आहे? आईचा फोटो दाखव. तुझे वडील कुठे आहेत?” असे त्यांनी विचारले. मात्र नेटवर्कच्या समस्येमुळे टिंकलला त्यांचे बोलणे व्यवस्थित समजले नसावे. यानंतर रिजिजू यांनी तिला आईला “किरण अंकलचा फोन आला होता”, असा निरोप देण्यास सांगितले. त्यांनी टिंकलला यापूर्वी कोण चिडवत होते, असेही विचारले. “आता संपूर्ण भारत तुझ्यावर प्रेम करतो. तू खूप प्रसिद्ध झाली आहेस, माहिती आहे का?” असेही ते म्हणाले.

‘हम लोग इंडियन हैं’

काही दिवसांपूर्वी टिंकलचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. त्यात तिला चिनी म्हटल्याबद्दल तिने नाराजी व्यक्त केली होती.

“आम्हीही भारतीय आहोत. तुम्ही आम्हाला चीनी म्हणता तेव्हा आम्हाला फार राग येतो, फार वाईट वाटतं. मला भारतीय म्हणा. मी भारतीय आहे. मी इटानगरमध्ये राहते”, असे तिने व्हिडिओमध्ये म्हटले होते. ईशान्य भारतातील लोकांना त्यांच्या दिसण्यावरून परदेशी किंवा चिनी समजले जाण्याच्या अनुभवावरही या व्हिडिओमुळे चर्चा सुरू झाली.

टिंकलचा संदेश साधा होता, “ती भारतीय आहे आणि तिला भारतीय म्हणूनच ओळखले जावे अशी तिची इच्छा आहे.” मात्र, तिच्या या मोजक्या शब्दांनी अशाच प्रकारच्या गोष्टींचा सामना करणाऱ्या अनेकांच्या मनाला स्पर्श केला आणि एका लहान मुलीच्या त्या स्पष्ट प्रतिसादाचे रूपांतर ओळख व आपलेपणा यांवरील चर्चेत झाले.

रिजिजू यांच्यासोबतचा हा व्हिडिओ कॉल त्यांच्या ‘इंडिया टुडे’च्या मुलाखतीतील एक अनौपचारिक क्षण ठरला. या मुलाखतीत त्यांनी राहुल गांधींची ‘स्मॅश पॅट्रिआर्की’ मोहीम, मनुस्मृती, ‘दिमागी नक्षल’, विद्यार्थी आंदोलन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वशैलीसह भाजपा आणि विरोधकांमधील राजकीय संबंधांवरही भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींची नेतृत्वशैली आणि विरोधी पक्षांशी भाजपाचा संवाद यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा केली.