राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत हे नुकतेच अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथील त्यांच्या कार्यक्रमाला अमेरिकेत विरोध झाला होता. त्यामुळे मोहन भागवत यांचा हा दौरा चांगलाच चर्चेत राहिला. मात्र, मोहन भागवत यांच्या एका कार्यक्रमादरम्यान बाहेर सुरू असलेल्या निदर्शनावेळी भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याची घटना समोर आली आहे.

या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारतीय राष्ट्रध्वजाचा कथित अवमान करणारा संतापजनक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. याच व्हायरल व्हिडीओवरून आता भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही संताप व्यक्त करत भारतीय तिरंग्याचा अवमान करणाऱ्यांना मोठा इशारा दिला आहे.

मंत्री किरेन रिजिजू यांनी यावरून तीव्र आक्षेप नोंदवला आहे. तसेच रिजिजू यांनी निदर्शकांना इशारा देत अशा प्रकारची वर्तणूक अजिबात खपवून घेतली जाणार नाही, हे तुम्हाला खूप महागात पडेल, असं किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. या संदर्भात रिजिजू यांनी सविस्तर पोस्ट शेअर केली आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

किरेन रिजिजू यांनी काय म्हटलं?

भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानाच्या घटनेचा व्हिडीओ मंत्री किरेन रिजिजू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (ट्विटर) शेअर करत म्हटलं की, “कोणालाही आरएसएस, भाजपा किंवा सरकारवर टीका करण्याचं स्वातंत्र्य आहे. मात्र, आमच्या ध्वजाचा आणि माझ्या देशाचा अपमान करू नका. अन्यथा हे खूप महागात पडेल”, असा इशारा किरेन रिजिजू यांनी दिला आहे.

Kiren Rijiju Indian Flag Insult Controversy

व्हिडीओमध्ये काय दिसत आहे?

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या सत्यतेची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली नाही. मात्र, न्यूयॉर्कमधील ‘मॅडिसन स्क्वेअर गार्डन’ बाहेर एक व्यक्ती भारतीय ध्वजाचा अवमान करताना व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओवरून अनेकजण संताप व्यक्त करत आहेत.