वृत्तसंस्था, नवी दिल्ली जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये गतवर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या दहशतवादविरोधी कारवाईत शहीद झालेले लष्कराचे कर्नल मनप्रीत सिंह यांना मरणोत्तर कीर्ति चक्र जाहीर झाले आहे. मेजर मल्ला रामा गोपाल नायडू आणि रायफलमॅन रवी कुमार (मरणोत्तर) यांनाही शांतता काळातील दुसऱ्या क्रमांकाच्या लष्करी पदकाची घोषणा झाली असून जम्मू-काश्मीरचे साहाय्यक पोलीस अधीक्षक हुमायूँ भट यांनाही कीर्ति चक्राने गौरविण्यात येईल. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी १०३ शौर्य पुरस्कारांना मान्यता दिली. चार कीर्ति चक्रांसह १८ जणांना शौर्यचक्र (चौघांना मरणोत्तर), एक ‘बार टू सेना’ पदक, ६३ जणांना सेना पदक, ११ जणांना नौसेना पदक आणि सहा वायू सेना पदकांचा यात समावेश आहे. मुळचे चंदीगडजवळील भारोनजियान या पंजाबी गावाचे रहिवासी असलेले कर्नल मनप्रीत सिंह हे ‘राष्ट्रीय रायफल्स’मध्ये अधिकारी होते. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात अनंतनागच्या कोकरनाग भागात अतिरेकी चकमकीत कर्नल सिंह यांना वीरमरण आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई आणि अनुक्रमे सहा व दोन वर्षांची मुले असा परिवार आहे. हेही वाचा >>>थायलंडच्या पंतप्रधानांना पदावरून हटवले; नैतिकतेचे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयाचे आदेश सीआरपीएफला सर्वाधिक पुरस्कार स्वातंत्र्यदिनानिमित्त बुधवारी जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाने सर्वाधिक ५२ पदके पटकाविली आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या यादीनुसार २५ पदके जम्मू-काश्मीरमधील दहशतवादविरोधी कारवाईसाठी तर २७ पदके ही देशाच्या विविध भागांत नक्षलविरोधी कारवायांमध्ये शौर्य गाजविणाऱ्या जवानांना देण्यात येत आहेत.