मुझफ्फरनगरमध्ये शेतकरी नेत्यांची घोषणा

लखनऊ/ मुझफ्फरनगर : महत्त्वाच्या अशा उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असतानाच; उत्तर प्रदेशसह शेजारच्या राज्यांतील हजारो शेतकऱ्यांनी रविवारी मुझफ्फरनगर येथे ‘किसान महापंचायत’ आयोजित केली. ‘देश वाचवण्याच्या उद्देशाने’ हा मेळावा आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या वादग्रस्त कृषी कायद्यांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाने मुझफ्फरनगरमधील शासकीय इंटर कॉलेज मैदानावर या महापंचायतीचे आयोजन केले होते.

‘असे मेळावे देशभर घेतले जातील. आम्हाला देश विकला जाण्यापासून रोखायचा आहे. शेतकऱ्यांना व देशाला वाचवायला हवे, त्याचप्रमाणे उद्योग, कर्मचारी आणि युवक यांनाही वाचवणे हा या मेळाव्याचा उद्देश आहे’, असे भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले. मेधा पाटकर व योगेंद्र यादव हे या मेळाव्यात व्यासपीठावर उपस्थित होते.

उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, महाराष्ट्र व कर्नाटक यांसह इतर निरनिराळ्या राज्यांतील ३०० संघटनांशी संलग्न असलेले शेतकरी या मेळाव्यासाठी एकत्रित आले होते, असे बीकेयूचे माध्यम प्रभारी धर्मेद्र मलिक यांनी सांगितले.

निरनिराळ्या संघटनांचे झेंडे घेतलेल्या आणि वेगवेगळ्या रंगांच्या टोप्या घातलेल्या महिलांसह शेतकरी बसगाडय़ा, मोटारी व ट्रॅक्टरमधून कार्यक्रमस्थळी येताना दिसत होते. कर्नाटकमधील एका महिला शेतकरी नेत्याने कन्नड भाषेत भाषण दिले. कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी एकाने रणशिंग फुंकले व किसान एकता मंचाने हे छायाचित्र ट्विटरवर टाकले.

शेतक ऱ्यांशी फेरवाटाघाटींची गरज – वरुण गांधी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांबाबत निषेध करणाऱ्या शेतक ऱ्यांशी फेरवाटाघाटी करण्याची गरज भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी व्यक्त केली असून शेतक ऱ्यांच्या व्यथा वेदना जाणून घेण्याचे आवाहन केले आहे.  गांधी यांनी एका चित्रफितीत म्हटले आहे की, शेतक ऱ्यांच्या व्यथा वेदना जाणून घेण्याची गरज आहे. लाखो शेतकरी मुझफ्फरनगर येथे निदर्शनांसाठी एकत्र जमले असून ते आपल्याच हाडामांसाचे आहेत. आपण त्यांच्याशी परत वाटाघाटी करण्याची गरज आहे. सन्मानपूर्वक पद्धतीने त्यांच्या व्यथा वेदना व मते जाणून घेत त्यांच्याशी वाटाघाटी करून मतैक्य घडवून आणावे.