जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवार जिल्ह्य़ात झालेल्या दंगलीमुळे निर्माण झालेल्या अशांततेची केंद्र सरकारने दखल घेतली असून, या प्रकरणी काश्मीर सरकारने अहवाल द्यावा, अशी सूचना केंद्राने केली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री आर. पी. एन. सिंग यांनी सोमवारी संसदेबाहेर पत्रकारांना ही माहिती दिली. काश्मीरमध्ये घडलेला हिंसाचार गंभीर असून आम्ही राज्य सरकारच्या सतत संपर्कात आहोत. काश्मीर खोऱ्यात शांतता पुनप्र्रस्थापित व्हावी, यासाठी आवश्यक असणारी सर्व मदत आम्ही करत आहोत. दंगलीची आग पुन्हा भडकू नये यासाठी दंगेखोरांना त्वरित अटक करावी आणि या दंगलीचा विस्तृत अहवाल केंद्राला द्यावा, अशी सूचना आम्ही त्यांना केली आहे.
जम्मूमधील अनेक जिल्ह्य़ांत अद्याप तणाव असल्याने तेथील संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे, तसेच जम्मू आणि राजौरी भागात अनेक ठिकाणी लष्कराचे अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, दंगलग्रस्त भागात शांतता नांदावी, यासाठी जम्मू-काश्मीरमधील सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी किश्तवारला भेट देणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली.
पुन्हा भडका
गेल्या शुक्रवारी झालेल्या या दंगलप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केल्याच्या निषेधार्थ सोमवारी रस्त्यावर उतरलेल्या मोठय़ा जमावात आणि पोलिसांच्यात धुमश्चक्री उडाली. या दंगलीमुळे संचारबंदी लागू असल्याने पोलिसांनी या जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. या वेळी झालेल्या दगडफेकीत दोन पोलीस जखमी झाले, तर पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन तरुणही जखमी झाले. दरम्यान, काश्मीरमधील तणावग्रस्त परिस्थितीमुळे थांबविण्यात आलेली अमरनाथ यात्रा सोमवारी तिसऱ्या दिवशीही सुरू होऊ शकली नाही.
भाजपचा आरोप
किश्तवार येथे झालेल्या दंगलीवरून जम्मू-काश्मीर सरकार हीन पातळीचे राजकारण करत आहे, असा आरोप भाजपने केला. काश्मीरमधील फुटीरतावादी आणि पाकिस्तानशी जवळीक असणाऱ्या संघटनाच या दंगलीसाठी जबाबदार असून या संघटना भारतविरोधी घोषणा देत आहेत, हे राज्य सरकारने लक्षात घ्यायला हवे, आम्ही या दंगलीच्या आगीत तेल ओतू इच्छित नाही, मात्र ओमर अब्दुल्ला यांच्या सरकारने या दंगलीचे गांभीर्य ओळखण्याची आवश्यकता आहे, असे भाजपचे प्रवक्ता प्रकाश जावडेकर म्हणाले.
 दंगलग्रस्त भागाला भेट देण्यासाठी गेलेले भाजपचे नेते अरुण जेटली यांना श्रीनगर विमानतळावरच रोखण्यात आले होते, राज्य सरकारच्या या निर्णयाचाही जावडेकर यांनी निषेध केला.