जम्मू : पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी रविवारी किश्तवाड जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाले, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. दहशतवाद्यांनी लपून बसलेल्या घराला चकमकीदरम्यान आग लागल्याने तिन्ही मृतदेह ओळखू न येण्याइतके जळाले असल्याचे त्यांनी सांगितले. ठार झालेल्यांपैकी एक जण जैशचा म्होरक्या सैफुल्ला असल्याचा संशय आहे. ‘त्राशी-१’ या मोहिमेदरम्यान पासेरकुट (छत्रू पट्टा) परिसरात ही कारवाई करण्यात आली.

सैफुल्ला सुमारे पाच वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करून आला होता आणि तेव्हापासून तो या भागात सक्रिय होता. जुलै २०२४ मध्ये चार जवानांचा मृत्यू झालेल्या हल्ल्यासह सुरक्षा दलांवरील अनेक प्राणघातक हल्ल्यांचा सूत्रधार तो असल्याचा आरोप आहे. यापूर्वी तो अनेक चकमकीतून पळून जाण्यात यशस्वी झाला होता. सायंकाळी तिसर्‍या दहशतवाद्याचा मृतदेह आणि एक शस्त्र जप्त करण्यात आले. येथून दोन एके-४७ रायफल्ससह दारुगोळा जप्त करण्यात आला.

यापूर्वी उत्तर लष्कर कमांडर लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा यांनी व्हाईट नाइट दलाच्या जवानांच्या वेगवान आणि अचूक कारवाईचे कौतुक केले. अत्यंत कठीण भौगोलिक आणि हवामान परिस्थितीत सातत्याने कामगिरी करणार्‍या कमांडर व जवानांचे लष्करप्रमुखांनी अभिनंदन केले असून, उत्तर कमांड दहशतवादमुक्त जम्मू-काश्मीरसाठी कटिबद्ध असल्याचे लष्कराने ‘एक्स’वरील संदेशात म्हटले आहे.

अचूक नियोजन

अचूक नियोजन, समन्वय आणि आक्रमकतेचे प्रदर्शन करत जवानांनी चकमकीचे ठिकाण पूर्णपणे ताब्यात घेतले, असे लष्कराने म्हटले. ‘शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणार्‍यांना कुठेही आश्रय मिळणार नाही,’ असेही नमूद करण्यात आले.