कोलकाता नाईट रायडर्सची संघ मालक असणारी अभिनेत्री जुही चावला ही सोशल नेटवर्किंगवर खूपच अ‍ॅक्टीव्ह आहे. बुधवारी जुहीेने ट्विटरवरुन भारतीय विमानतळ प्राधिकरण म्हणजेच एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियावर टीका केली आहे. विमानतळावर करोनाच्या कालावधीमध्ये असलेली व्यवस्थापनातील दिरंगाई आणि त्यामुळे होणाऱ्या गर्दीवरुन जुहीने नाराजी व्यक्त केली आहे.

इंडियन प्रिमियर लीगचे (आयपीएल) तेरावे पर्व नुकतेच दुबईमध्ये पार पडले. मंगळवारी संध्याकाळी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या संघामध्ये झालेल्या अंतिम सामन्याने या मालिकेचा समारोप झाला. आयपीएलसाठी दुबईला गेलेली जुही बुधवारी मायदेशी परतली. मात्र दुबईवरुन परतल्यानंतर विमानतळावर क्लियरन्ससाठी अनेक प्रवाशी दोन तासाहून अधिक काळ रांगेत उभे असल्याचे सांगत जुहीने या गर्दीचा एक व्हिडीओच पोस्ट केला आहे.

“मी विमानतळ प्राधिकरण आणि सरकारी यंत्रणांना विनंती करते की त्यांनी विमानतळांवरील आरोग्य तपासणी केंद्रावर अधिक कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी. सर्व प्रवासी अशाप्रकारे अनेक तास विमानतळावर अडकून पडलेत. त्यात एका मागून एक विमान येत असल्याने परिस्थिती आणखीनच चिंताजनक होते. ही परिस्थिती अगदी लाज आणणारी आहे,” अशा शब्दांमध्ये जुहीने आपला संताप व्यक्त केला आहे.

परदेशातून भारतामध्ये येणाऱ्या व्यक्तींना आरोग्य मंत्रालयाने क्वारंटाइन होण्यासंदर्भातील नियम रद्द केले आहेत. मात्र त्यासाठी या प्रवाशांना करोनाची चाचणी नकारात्मक असल्याचा रिपोर्ट आरटी-पीसीआर चाचणीच्या अहवालासहीत प्रवासानंतर तीन दिवसांमध्ये दाखल करावा लागणार आहे. मंगळवारपासून आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांसाठी सरकारने लागू केलेल्या नवीन नियमांमध्ये यासंदर्भातील उल्लेख आहे.

जुही को ओनर असणाऱ्या कोलकात्याला यंदाचे आयपीएल फारसे चांगले गेले नाही. कोलकात्याच्या संघ बादफेरीआधीच स्पर्धेबाहेर फेकला गेला. साखळी फेरीतील मुंबई विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यामध्ये हैदराबादने विजय मिळवल्याने कोलकात्याच्या संघाला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले आणि त्यांचा स्पर्धेतील प्रवास संपला. अ‍ॅण्ड्रे रस्सल, सुनील नारेनसारख्या खेळाडूंना यंदा चमक दाखवता आली नाही. तर दुसरीकडे शुभमन गीलसारख्या नवख्या खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.