scorecardresearch

Republic Day 2022: यावर्षीच्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये प्रमुख पाहुणे नाहीत; जाणून घ्या कारण

भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून परदेशी मान्यवर नसण्याची ही दुसरी वेळ आहे.

यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांचे चित्ररथ दाखवण्यासाठी निवड करण्यात आली आहे. एएनआयच्या म्हणण्यानुसार, १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि नऊ मंत्रालयांसह एकूण २१ चित्ररथ आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात त्यांची झलक दाखवणार आहेत.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जानेवारीच्या कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून कोणतेही परदेशी मान्यवर उपस्थित राहणार नाहीत. परंतु यापूर्वी भारत राजधानी दिल्लीत होणाऱ्या यंदाच्या प्रजासत्ताक दिन परेडसाठी उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, कझाकिस्तान, किर्गिस्तान आणि ताजिकिस्तानच्या नेत्यांना आमंत्रित करण्याची योजना आखत होता. भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून परदेशी मान्यवर नसण्याची ही दुसरी वेळ आहे.

भारतीय प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे कसे निवडले जातात?

भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये प्रमुख पाहुण्याला प्रोटोकॉलनुसार देशाचा सर्वोच्च सन्मान दिला जातो, परंतु प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य अतिथीची निवड कशी केली जाते हे तुम्हाला माहिती आहे का? प्रजासत्ताक दिनाच्या सहा महिने आधी, भारत सरकार एकतर राज्यप्रमुख किंवा भारताचे घनिष्ठ संबंध असलेल्या दुसऱ्या देशाच्या सरकारला आमंत्रण पाठवते. आमंत्रण पाठवण्यापूर्वी भारताच्या राष्ट्रपतींची आणि भारताच्या पंतप्रधानांचीही परवानगी घेतली जाते.

दरम्यान, १४ जानेवारी २०२१ रोजी, परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) घोषणा केली होती की करोनामुळे, प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारा कोणताही परदेशी नेता नसेल. देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे नसण्याची पाच दशकांतील ही पहिलीच वेळ होती. २०२०मध्ये, भारताने २६ जानेवारी २०२१ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. मात्र, नंतर त्यांचा दौरा रद्द करण्यात आला. यूकेच्या परराष्ट्र कार्यालयाने नंतर एक निवेदन जारी केले की, हा दौरा रद्द करण्याचा निर्णय करोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे.

एक स्वतंत्र, सार्वभौम आणि लोकशाही देश म्हणून भारताने २६ जानेवारी १९५० रोजी आपली राज्यघटना लागू केली. तेव्हापासून भारत एक लोकशाही प्रजासत्ताक असल्याने दरवर्षी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एका भव्य समारंभाचे आयोजन केले जाते आणि भारत सरकारकडून दरवर्षी परदेशी नेत्याला आमंत्रित केले जाते.

सुरुवातीच्या १९५० ते १९५४ दरम्यान चार प्रजासत्ताक दिन परेड वेगवेगळ्या ठिकाणी (लाल किल्ला, रामलीला मैदान, इर्विन स्टेडियम, किंग्सवे) आयोजित करण्यात आल्या होत्या. तर, १९५५ मध्ये राजपथ हे प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी कायमस्वरूपी ठिकाण म्हणून निवडले गेले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Know why no guest on indias republic day 2022 parade hrc