भर गर्दीच्या रस्त्यात गाडी चालविणे हा लहान मुलांचा खेळ नाही. पण कोचीमध्ये एका पाच वर्षांच्या मुलीने भरधाव गाडी चालवून सर्वांना हैराण करुन सोडले. आता इतक्या लहान मुलीने गाडी चालवली म्हणजे ती एकटी गाडी घेऊन गेली की काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर असे नसून ही मुलगी वेगाने गाडी पळवत असताना तिचा संपूर्ण परिवार तिच्यासोबत गाडीवर होता. गाडीचे हँडल सांभाळणाऱ्या या मुलीसोबत यावेळी तिचे आई-वडिल आणि लहान बहीणही होते. हा व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर बऱ्याच चर्चा रंगल्या आहेत. अशाप्रकारे इतक्या लहान मुलीला गाडी हातात देणे योग्य आहे का? अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण? पालकांना आपल्या जबाबदारीचे भान आहे का असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

व्हिडियोमध्ये ही लहानही गाडीवर आपण पाय ठेवतो त्याठिकाणी वडिलांच्या पुढे उभी आहे. अशाप्रकारे पुढे उभे असताना मुले गाडी गाडी खेळण्याचा प्रयत्न करतात. त्यांना रमविण्यासाठी पालकही त्यांना हँडल धरु देतात. मात्र पूर्णपणे गाडीच चालवायला देणे, तेही गर्दीच्या रस्त्यावर हे अतिशय धोकादायक आहे. अशाप्रकारे बेजबाबदारपणे वागल्यामुळे शिबु फ्रान्सिस या मुलीच्या वडिलांचा वाहन परवाना आरटीओकडून रद्द करण्यात आला आहे. अशाप्रकारचा निष्काळजीपणा चार जणांचा प्राण घेऊ शकतो हे पालकांनी लक्षात घ्यायला हवे. लहान मुले गाडीवर असताना त्यांना नियम शिकविण्याऐवजी हे पालक नियम धाब्यावर बसवत आहेत.