ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स तिसरे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. “जर मला किंग चार्ल्स यांच्याशी खाजगीत बोलण्याची संधी मिळाली, तर मी त्यांना ऐतिहासिक ‘कोहिनूर’ हिरा भारताला परत करण्याची विनंती करेन,” असे ममदानी यांनी बुधवारी स्पष्ट केले.

११ सप्टेंबरच्या दहशतवादी हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित कार्यक्रमापूर्वी एका पत्रकार परिषदेत ममदानी बोलत होते. मूळचे भारतीय वंशाचे असलेले झोहरान ममदानी म्हणाले की, कोहिनूरचा विषय अधिकृत अजेंड्यावर नसला, तरी वैयक्तिक भेटीत ते यावर नक्कीच भाष्य करतील. नंतर ९/११ स्मारक कार्यक्रमात किंग चार्ल्स आणि ममदानी यांच्यात थोडक्यात संवाद झाला. मात्र, या संवादात कोहिनूरबाबत चर्चा झाली का, हे अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणावर बकिंगहॅम पॅलेस किंवा महापौरांच्या कार्यालयाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

कोहिनूरचा वाद आणि इतिहास

कोहिनूर हिरा हा जगातील सर्वात प्रसिद्ध हिऱ्यांपैकी एक आहे. १०५.६ कॅरेटचा हा हिरा भारताच्या इतिहासाशी आणि अस्मितेशी जोडलेला आहे. १८४९ मध्ये ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने ‘लाहोर करारा’द्वारे हा हिरा हस्तगत केला होता. त्यावेळी अवघ्या १० वर्षांचे असलेले शीख महाराज दुलिप सिंग यांना हा हिरा ब्रिटिशांच्या स्वाधीन करण्यास भाग पाडले होते. हा हिरा सध्या ब्रिटीश राजघराण्याच्या मुकुटाचा भाग असून तो ‘टाॅवर ऑफ लंडन’मध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे.

भारताची भूमिका

भारत सरकारने अनेकदा कोहिनूर परत करण्याची मागणी केली आहे. भारताच्या मते, हा हिरा भेट म्हणून दिलेला नसून तो वसाहतवादी काळात बळजबरीने हिरावून घेतला होता. कोहिनूर हा केवळ एक दागिना नसून तो भारताच्या सांस्कृतिक वारशाचा आणि इतिहासाचा एक अनमोल भाग आहे. दुसरीकडे, ब्रिटनने नेहमीच या मागणीला विरोध केला आहे. १९ व्या शतकातील कराराचा आधार घेत ब्रिटन या हिऱ्यावर आपला कायदेशीर हक्क सांगते.

कोहिनूर हिऱ्याचा प्रवास

कोहिनूरचा प्रवास थक्क करणारा आहे. काकतीय राजवंशापासून सुरू झालेला हा प्रवास मुघल सम्राट, पर्शियन शाह आणि अफगाण अमिरांच्या हातातून जात अखेर ब्रिटीशांपर्यंत पोहोचला. आता न्यूयॉर्कच्या महापौरांच्या या विधानामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा या विषयाची चर्चा सुरू झाली आहे. वसाहतवादाच्या खुणा पुसून टाकण्यासाठी भारताचा हा ऐतिहासिक हिरा मायदेशी परत यावा, अशी भावना ममदानी यांच्या विधानातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.