Rajya Sabha Polls Sambhajiraje Chhatrapati Open Letter: राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आणि घडामोडींना वेग आला. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपाचे दोन, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक असे पाच जण सहजपणे निवडून येतील. खरी चुरस ही सहाव्या जागेसाठीच आहे. माजी खासदार संभाजीराजे यांनी  ही निवडणूक अपक्ष म्हणून लढविणार असल्याचे जाहीर केले. त्याच्या एक दिवस आधी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजे यांच्या उमेदवारीबाबत महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करावी लागेल, असे सांगत त्यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी पाठिंबा देईल, असे संकेत दिले आहे. असं असतानाच आता संभाजीराजे यांनी महाराष्ट्रातील सर्व विधानसभा आमदारांना खुले पत्र लिहिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आपणांस कल्पना आहेच की, महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. या निवडणुकीत मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोणत्याही उमेदवारास विधानसभा सदस्यांच्या ४२ मतांची आवश्यकता आहे,” असं म्हणत संभाजीराजेंनी पत्राला सुरुवात केली आहे. यावरुनच हे पत्र खासदारकीच्या निवडणुकीसंदर्भातील असल्याचं स्पष्ट होत आहे.

“महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय संख्याबळाचा विचार करता, या सहा जागांपैकी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांना प्रत्येकी एक व भाजपाला दोन जागांवरती विजय मिळविणे शक्य वाटते. उर्वरित एक जागेकरिता कोणत्याही एका पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही. करिता, या जागेवरती अपक्ष म्हणून मला संधी देण्यात यावी, असे आवाहन मी सर्व राजकीय पक्षांना व अपक्ष आमदारांना केलेले आहे,” अशी आठवण संभाजीराजेंनी करुन दिलीय.

“२००७ पासून सामाजिक चळवळींच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात मी कार्यरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेली शिकवण आचरण करीत मी राजकारण विरहित कार्य करीत आलो आहे. राष्ट्रपतीनियुक्त खासदार असताना देखील कोणत्याही बाबतीत भूमिका घेताना वैयक्तिक राजकीय भवितव्याचा विचार न करता, सदैव समाजाला दिशा देण्याचीच भूमिका घेतली. संसदेत काम करीत असताना महाराष्ट्राच्या व देशाच्या हितासाठी कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता पक्षविरहित काम केले,” असं संभाजीराजेंनी आपल्या कामगिरीचा आढावा घेताना म्हटलं आहे.

“छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संतांच्या विचारांची बैठक असणारा हा महाराष्ट्र या विचारांवरून ढळू नये, यासाठी रस्त्यापासून ते संसदेपर्यंत मी झटत राहिलो. जनकल्याणालाच नेहमी व एकमेव प्राधान्य दिले. मात्र हे सर्व करताना लोकहिताची कामे करण्यासाठी हाती सत्तापद असणे हे किती सोयीस्कर असते, हे खासदाकीच्या कारकिर्दीत माझ्या लक्षात आले. याचमुळे, राज्यसभेच्या या सहाव्या जागेवर मी दावा करीत आहे. याकरिता मला आपणा सर्वांच्या मदतीची आवश्यकता आहे,” असं संभाजीराजेंनी म्हटलंय.

“माझी कारकीर्द व प्रामाणिक कार्यपद्धती पाहता, आपण सर्वजण राज्यसभेच्या या सहाव्या जागेसाठी मला निश्चितच सहकार्य कराल, अशी जाहीर अपेक्षा सदर पत्रान्वये मी व्यक्त करतो,” असं त्यांनी पत्राच्या शेवटी म्हटलंय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur royal sambhajiraje chhatrapati to contest rajya sabha polls as independent wrote open letter to mla for support scsg
First published on: 17-05-2022 at 18:16 IST