scorecardresearch

धावत्या लोकल ट्रेनमध्ये २४ वर्षीय तरुणीशी अश्लील चाळे; FB Live वरुन दिली माहिती, आरोपी अटकेत

महिलांसाठी आरक्षित असणाऱ्या डब्ब्यामध्ये हा तरुण चढला. आधी तो शांत बसला होता नंतर त्याने या तरुणी समोर येऊन पैशाची मागणी केली.

Kolkata 24 year old woman molested on train
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी केली कारवाई (फोटो सोशल नेटवर्किंगवरुन साभार)

पश्चिम बंगालमधील नॉर्थ २४ परगना जिल्ह्यामधील दमदम स्थानकाजवळ धावत्या ट्रेनमध्ये एका तरुणीसोबत छेडछाड करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. मात्र या तरुणाने प्रसंगावधान दाखवत संपूर्ण घटनाक्रम फेसबुकवरुन लाइव्ह वेबकास्ट करत यासंदर्भातील माहिती पोलिसांना दिली. या तक्रारीच्या आदारावर पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका ३२ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, एका २४ वर्षीय तरुणी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नादिया जिल्ह्यामधील फुलिया स्थानकामध्ये शांतीपूर-सियालदह लोकल ट्रेनमध्ये बसली. ही ट्रेन दमदम स्थानकामध्ये पोहचली तेव्हा ट्रेनचा संपूर्ण डब्बा जवळजवळ खाली झाला. याच स्थानकावर आरोपी तरुण रेल्वेमध्ये चढला. ट्रेनमध्ये चढल्यानंतर हा इसम तरुणीसोबत अश्लील चाळे करु लागला. त्याने तिच्याकडे पैसे मागण्यास आणि तिला धमकावण्यास सुरुवात केली. या तरुणीने फेसबुक लाइव्ह करत संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.

महिलांसाठी आरक्षित असणाऱ्या डब्ब्यामध्ये मी एकटी असताना हा सर्व प्रकार घडल्याचं या तरुणीने म्हटलंय. दमदम स्थानकामध्ये महिलांसाठी आरक्षित असणाऱ्या या डब्ब्यामध्ये एक इसम चढला. आधी तो शांत बसून होता. नंतर मात्र तो माझ्याजवळ आला आणि माझी छेड काढू लागला, अश्लील चाळे करु लागला. मी फेसबुक लाइव्ह करुन यासंदर्भातील तक्रार केली. पीडित तरुणीने दमदम जीआरपीमध्ये या प्रकरणाची तक्रार दाखल केली असून नक्की काय घडलं हे सविस्तरपणे आपल्या तक्रारीत सांगितलं आहे. आपण फेसबुक लाइव्ह केल्यानंतर हा तरुण सियालदह स्थानकावर उतरला आणि पळून गेला, असंही या तरुणीने म्हटलंय.

ही घटना घडली तेव्हा तरुणी डब्ब्यामध्ये एकडी होती. या तरुणीने रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणीने रेकॉर्ड केलेला व्हिडीओ आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करण्यात आलाय. या व्हिडीओंच्या आधारे व्यक्तीची ओळख पटवण्यात आली.

य़ा मुलीने केलेला फेसबुक लाइव्हचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांनी संयुक्तरित्या मोहीम राबवत शनिवारी सायंकाळी या व्यक्तीला अटक केली. या व्यक्तीचं नाव संजय साव असं असून तो नॉर्थ परगना २४ जिल्ह्याच्या रहिवाशी आहे. अटक करण्यात आल्यानंतर संजयला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kolkata 24 year old woman molested on train scsg

ताज्या बातम्या