कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठी विमान दुर्घटना टळली आहे. मलेशिया एअरलाइन्सचं एक विमान कोलकात्यात लँडिंग करत होतं. मात्र, या दरम्यान वैमानिकाच्या डोळ्यावर अचानक लेझर लाईट पडल्याने वैमानिकाला काही वेळ काहीही दिसेनासं झालं. त्यामुळे विमानाचं त्वरित लँडिंग करणं अशक्य झालं आणि विमानाने पुन्हा आकाशात झेप घेतली.
त्यानंतर काहीवेळ विमान आकाशातच घिरट्या घालत राहिलं. या घटनेवेळी विमानात जवळपास १५९ प्रवासी होते अशी माहिती सांगितली जाते. त्यानंतर काही वेळ विमानाने आकाशातच घिरट्या घातल्यानंतर अखेर विमानाचं विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आलं. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.
नेमकं काय घडलं?
मलेशिया एअरलाइन्सचं एक विमान कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर येत होतं. यावेळी हे विमान लँडिंग करत असतानाच अचानक वैमानिकाच्या डोळ्यावर कॉकपिटच्या दिशेने लेझर बीम म्हणजे लेझर लाईट चमकले. त्यामुळे वैमानिकाचा मोठा गोंधळ उडाला. कारण लेझर लाईटमुळे वैमानिकाला पुढे दिसेनासं झालं. त्यामुळे काहीवेळ गोंधळ उडाला.
त्यानंतर लगेचच काही क्षणांत विमानाने पुन्हा आकाशात झेप घेतली. वैमानिकाच्या डोळ्यांवर लेझर लाईट पडल्याने वैमानिकाला काही वेळ काहीही दिसेनासं झाल्यामुळे विमानाचं लँडिंग करणं अशक्य झालं. त्यामुळे विमानाने आकाशात झेप घेतल्यानंतर पुढील काही मिनिटे आकाशातच घिरट्या घातल्या.
एमएच-१८४ हे विमान क्वालालंपूर येथून कोलकाता या ठिकाणी रात्री ११:२० च्या सुमारास उतरणार होतं. मात्र, विमान धावपट्टीपासून काही अंतरावर असतानाच वैमानिकाच्या डोळ्यांवर लेझर लाईट पडली. त्यामुळे वैमानिकाच्या दृष्टीवर परिणाम झाल्यामुळे त्याचा विमानाच्या लँडिंगमध्ये व्यत्यय निर्माण झाला. त्यामुळे नियोजित वेळेत विमानाचं लँडिंग करता आलं नाही. त्यानंतर अखेर रात्री ११:२५ च्या सुमारास विमानाचं सुरक्षितपणे लँडिंग करण्यात आलं. या घटनेत सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर मलेशिया एअरलाईन्सने कोलकाता येथील विमानतळ प्रशासनाला लेझरच्या व्यत्ययाबाबत माहिती दिली. यानंतर कोलकाता विमानतळ प्रशासनाने पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती सांगण्यात आल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
