Kolkata Airport Mosque Removal runway expansion: कोलकातामधील नेताजी सुभाष चंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळाला पुन्हा एकदा संजीवनी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या विमानतळाच्या दुय्यम धावपट्टीच्या शेवटी एक मशीद आहे. ज्यामुळे ही धावपट्टी पूर्ण क्षमतेने वापरता येत नव्हती. मात्र या ठिकाणाहून मशीद हटवल्यास विमानतळाचे आयुर्मान १० वर्षांनी वाढणार असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीनेही ही मशीद हटवणे गरजेचे असल्याचे म्हटले गेले आहे.
नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि राज्य सरकारने सुरक्षेचे कारण देत मशीद हटविण्याची मागणी केली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जर ही मशीद हटवले आणि दुय्यम धावपट्टीचा विस्तार करून ती प्राथमिक धावपट्टीच्या बरोबरीने आणली तर २०३५ साली मुदत संपणाऱ्या विमानतळाचा वापर आणखी १० वर्ष म्हणजे २०४५ पर्यंत केला जाऊ शकतो.
विमानतळावर नवीन टर्मिनल बांधले जात असून यामुळे प्रवाशांना हाताळण्याची क्षमता वाढू शकणार आहे. मात्र प्रवाशांच्या वाढत्या संख्येबरोबरच धावपट्टीची क्षमताही वाढवणे गरजेचे आहे, अशी माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली. जर मशीद हटवली गेली तर मोकळ्या होणाऱ्या जागेत दुय्यम धावपट्टीचा विस्तार केला जाऊ शकतो.
प्राथमिक आणि दुय्यम धावपट्टीची क्षमता किती?
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, प्राथमिक धावपट्टीवरून ताशी ४२ विमानांची वाहतूक हाताळली जाते. पण आठवड्यातून एक ते दोन दिवस दुरुस्तीच्या कामासाठी ही धावपट्टी बंद ठेवावी लागते. तेव्हा दुय्यम धावपट्टीवरून विमाने हाताळली जातात. मात्र ही धावपट्टी लहान असल्यामुळे ताशी केवळ २७ विमाने हाताळली जातात.
विमानतळ अधिकाऱ्याने सांगितले की, मशीद हटविल्यानंतर दुय्यम धावपट्टीही पूर्ण क्षमतेने वापरता येईल आणि त्यावरूनही किमान ४२ विमाने दर तासाला हाताळता येतील. याचे गणित उलगडून सांगताना अधिकाऱ्यांनी पुढे म्हटले, प्रत्येक तासाला १० विमानांची भर पडल्यास १२ तासांच्या अवधीत १२० अधिक विमाने या विमानतळावरून उड्डाण घेऊ शकतील.
दिवसाला १२० विमानांची भर पडल्यामुळे दिवसाला १८ हजार आणि वर्षाला ६५ लाख प्रवाशांची भर पडेल, असाही विश्वास व्यक्त करण्यात आला.
सुरक्षेचाही विषय
मशिदीचे विस्थापन हा केवळ विमानतळाच्या विस्ताराचा विषय नाही. सुरक्षेच्या दृष्टीनेही तो अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले जाते. आंतरराष्ट्रीय मानकानुसार मुख्य धावपट्टी संपल्यानंतर अतिरिक्त २४० मीटरची धावपट्टी पुढे असणे आवश्यक आहे. मात्र सदर मशीद ही धावपट्टीपासून केवळ १६० मीटरच्या अंतरावर आहे. यामुळे मोठे विमान याठिकाणी उतरू शकत नाहीत.
तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्ष दल यांच्याकडून बायोमेट्रिक आणि एईपी तपासणी केल्याशिवाय बाहेरचे लोक मशिदीत म्हणजेच विमानतळाच्या परिसरात प्रवेश करत असतात, ही सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब असल्याचे सांगितले जाते.
