Kolkata Doctor Rape and Murder Case : कोलकात्यामध्ये आर. जे. कर राज्य सरकारी रुग्णालयात एका डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली असल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात बलात्कार व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला आज सियालदह न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी चौकशीसाठी त्याची कोठडी मागितली होती जी न्यायालयाने मंजूर केली आहे. न्यायमूर्तींनी फिर्यादीची विनंती मान्य करत आरोपीला २३ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. ३१ वर्षीय डॉक्टरचा मृतदेह शुक्रवारी (९ ऑगस्ट) सकाळी रुग्णालयातील सेमिनार हॉलमध्ये मृतावस्थेत आढळला होता. चौकशी अहवालानुसार, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहावर अनेक जखमा दिसत होत्या. तसेच मृतदेहावर अर्धवट कपडे होते. या घटनेमुळे रुग्णालयामधील कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला असून सखोल चौकशीच्या मागणीसाठी अनेक डॉक्टरांनी काम बंद केलं आहे. शनिवारी इतर वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरही या आंदोलनात सहभागी झाले. दरम्यान, पोलिसांनी आरोपी संजय रॉय याला रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज व इतर पुराव्यांच्या आधारे अटक केली आहे. पोलिसांनी सांगितलं की अटक केलेला आरोपी संस्थेबाहेरचा आहे. मात्र त्याचं रुग्णालयात नेहमी येणंजाणं होतं. त्यामुळे त्याला रुग्णालयाच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये सहज ये-जा करता येत होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी म्हटलं आहे की त्याच्या हालचाली संशयास्पद होत्या. तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर या प्रकरणातील आरोपीचा शोध घेत असताना त्यांना एका ब्लूटूथ ईयरबडचा छोटासा तुकडा सापडला होता. या छोट्याशा पुराव्याच्या आधारावर पोलीस आरोपीपर्यंत पोहोचू शकले. पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्यानंतर रुग्णालयातील इतर डॉक्टरांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर आरोपीची ओळख पटवली आहे. हे ही वाचा >> Bangladesh Crisis : “पिस्तुल रोखलं, बेड्या ठोकून वीजेचे झटके दिले”, BNP कार्यकर्त्यांनी सांगितली पोलिसांच्या अत्याचाराची कहाणी कोण आहे आरोपी संजय रॉय? पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी संजय रॉय हा सामाजिक कार्यकर्ता (स्वयंसेवक) बनून रुग्णालयात नेहमी ये-जा करत होता. असे स्वयंसेवक कंत्राटी कर्मचारी असतात. वाहतूक व्यवस्थापनासाठी वाहतूक पोलिसांना मदत करतात. सणासुदीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी जातात. अनधिकृत पार्किंग हटवण्यासाठी मदत करतात. हे स्वयंसेवक प्रामुख्याने पोलिसांना मदत करण्याचं काम करतात. हे ही वाचा >> Junior Doctor’s Death : अर्धनग्न अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणीचा मृतदेह; सरकारी रुग्णालयात डॉक्टरची निर्घृण हत्या! खटला जलदगती न्यायालयात चालवणार दरम्यान, या घटनेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “ही घटना दुर्दैवी आणि निंदनीय आहे. हे मला वैयक्तिक नुकसानीसारखे वाटते. या प्रकरणानंतर उफाळून आलेला डॉक्टरांचा राग आणि मागण्या रास्त आहेत. मी त्यांचं समर्थन करते. मी काल झारग्राममध्ये होते, पण मी सर्व घडामोडींवर लक्ष ठेवत होते. मी पीडितेच्या कुटुंबीयांशी बोलून याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, असे निर्देशही मी दिले आहेत.