Mamata Banerjee : शुक्रवारी (९ ऑगस्ट) कोलकात्यातील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये ३१ वर्षीय महिला डॉक्टरचा मृतदेह आढळून आला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. तसेच मृतदेहावर अर्धवट कपडे होते. या घटनेनंतर आता सर्वत्र संताप व्यक्त केला जातो आहे. या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर पकडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, याप्रकरणावर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना महिला डॉक्टरच्या मृत्यूबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, त्यांनी थेट पोलिसांनाच इशारा दिला. हेही वाचा - निती आयोगाच्या बैठकीबाबत ममतांचा वेगळा सूर; मित्रपक्षांचा बहिष्कार असताना उपस्थिती नेमकं काय म्हणाला ममता बॅनर्जी? कोलकात्यातील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयाच्या महिला डॉक्टरच्या हत्येचं प्रकरण दुर्दैवी तसेच धक्कादायक आहे. याप्रकरणात जे कुणी दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. हे प्रकरण आम्ही फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याचा प्रयत्न करू, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. तसेच रुग्णालयात इतर परिचारिका असताना ही घटना घडली, याचं आश्चर्य वाटतं, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. ममता बॅनर्जींचा पोलिसांना इशारा पुढे बोलताना त्यांनी याप्रकरणी थेट पोलिसांनाही इशारा दिला. पोलिसांनी रविवारपर्यंत या हत्येमागे कोण आहे, याचा शोध घ्यावा, अन्यथा त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे हस्तांतर करण्यात येईल, असं त्यांनी सांगितले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यांचा राजीनामा या प्रकरणी आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे प्राचार्य डॉ. संदीप घोष यांनी सोमवारी सकाळी आपल्या पदाचा राजीनाम दिला आहे. “सोशल मीडियावर माझी बदनामी होत आहे. याप्रकरणात ज्या मुलीचा मृत्यू झाला ती माझ्या मुलीसारखी आहे. त्यामुळे पालक असल्याच्या नात्याने मी राजीनामा देत आहे. असे प्रकार भविष्यात कधीच घडू नयेत असं वाटतं. तिला वाचवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला. पण आमच्या चेस्ट विभागात तिचा मृत्यू झाला”, असं डॉ. संदीप घोष म्हणाले. हेही वाचा - पश्चिम बंगालवर सहा दशके राज्य करणाऱ्या डाव्यांचा शेवटचा नेता हरपला; अशी होती बुद्धदेव भट्टाचार्य यांची कारकीर्द सहकारी डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे आंदोलन या घटनेमुळे रुग्णालयामधील कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच याप्रकरणी सखोल चौकशीच्या मागणी केली आहे. या मागणीसाठी अनेक डॉक्टरांनी कामबंद आंदोलनही केलं. शनिवारी इतर वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरही या आंदोलनात सहभागी झाले. दरम्यान, पोलिसांनी आरोपी संजय रॉय याला रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज व इतर पुराव्यांच्या आधारे अटक केली आहे.