Kolkata law student Rape Case : कोलकाता लॉ कॉलेज बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी मोनोजित ‘मँगो’ मिश्रा याच्याबद्दल गेल्या काही दिवासांपासून धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. मिश्राने आता त्याने गुन्हा करतेवेळी पीडितेचा व्हिडीओ का काढला? याबद्दल पोलिसांना माहिती दिली आहे. याबरोबरच आरोपींनी इतरही अनेक गोष्टींबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत.
पोलीस ठाण्यावर लक्ष ठेवण्यास सांगितलं
हादरवून टाकणारा हा गुन्हा २५ जूनच्या संध्याकाळी घडला होता. पीडितेने तिच्या तक्रारीमध्ये सांगितले की, हा प्रकार घडल्यानंतर मोनोजित आणि त्याचे साथिदार प्रमित मुखोपाध्याय आणि झैब अहमद हे कॅम्पसमधून निधून गेले आणि त्यानंतर तिने तिच्या वडीलांन घ्यायला बोलावले होते.
कोलकाता पोलिसांच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, मोनोजितने त्याच्या काही मित्रांना पीडिता तक्रार दाखल करते का हे पाहण्यासाठी कस्बा पोलीस ठाण्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. हे पोलीस ठाणे कॉलेजपासून एक किलोमीटरच्या अंतरावर आहे. इतकेच नाही तर दुसऱ्या दिवशी मनोजितने कॉलेजमधील कर्मचार्यांना फोन केला आणि पोलीस कॅम्पसमध्ये आले होते का याची चौकशी देखील केली. जेव्हा पोलीस त्याच्या मागावर असल्याचे त्याच्या लक्षात आले तेव्हा त्याने त्याच्या वकील मित्राला आणि कॉलेजातील वरिष्ठांना फोन केला आणि मदत मागितली, पण कोणही पुढे आले नाही, असे सूत्रांनी सांगितले.
२६ जूनच्या संध्याकाळी मनोजित आणि झैब फर्न रोडच्या जवळ बल्लीगंज रेल्वे स्टेशनजवळ भेटले, हे ठिकाण कॉलेजपासून १.५ किलोमीटर अंतरावर आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ट्रेस करत दोघांना अटक केली. प्रमित याला त्याचा घरातून त्याच रात्री अटक करण्यात आली.
आरोपींनी सांगितले कारण
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोजित याने पोलिसांना सांगितले की प्रमित आणि झैब यांनी पीडितेवर अत्याचार करताना व्हिडीओ शूट केला आणि तो व्हिडीओ व्हायरल करेल या भीतीने पीडित मुलगी पोलिसांकडे तक्रार करणार नाही अशी त्यांना खात्री होती. अत्याचारचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्यानंतर २४ वर्षीय पीडिता पोलिसांत जाणार नाही असे वाटल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. यामुळेच त्यांनी अत्याचार करतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला.
तपासात असेही समोर आले आहे की पीडितेने कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यापासून मनोजितच्या निशाण्यावर होती. या कॉलेजचा माजी विद्यार्थी असलेला मनोजित हा तेथे कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होता. त्याचे मित्र त्याला ‘मँगो’ म्हणत असत, त्याने राजकीय संबंध वापरून कॅम्पसमध्ये दबदबा तयार केला होता.
झैब आणि प्रमित यांनी पोलिसांना सांगितले की पीडितेने मनोजितला यापूर्वी नकार दिला होता आणि मनोजित याला पीडितेला धडा शिकवायचा होता. त्याने शेवटचा प्रयत्न म्हणून तिला कॉलेज युनियनमध्ये जनरल सेक्रेटरी पद ऑफर केले होते. त्यानंतर त्याने २५ जून रोजी तिच्यावर अत्याचाराची योजना आखली.
“झैब आणि प्रमित यांनी सांगितले की, गुन्ह्याच्या किमान दोन दिवस आधी मोनोजितने त्यांना सांगितले होते की पीडित मुलगी परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी कॅम्पसमध्ये असेल. त्यांना तिला संध्याकाळपर्यंत तिथेच ठेवा असे सांगण्यात आले होते,” असे द टाईम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.
गुन्हा घडला त्या ठिकाणाच्या जवळ पोलिसांना महत्त्वाचा पुरावा सापडला आहे. बलात्काराची घटना ही कॉलेजचा सुरक्षा रक्षक वापरत असलेल्या खोलीत झाला. या खोलीतील बेडशीट हे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी सांगितले की मनोजित याच्या विरोधात पूर्वीच्या ११ केसेस आहेत ज्यापैकी बरीच प्रकरणे की महिलांचा छळ आणि गैरवर्तवणूक यासंबंधी आहेत. तो या प्रकरणात जमिनावर बाहेर होता.