Kolkata Rape Case: कोलकाता येथील विधी महाविद्यालयात झालेल्या बलात्कार प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि तृणमूल छात्र परिषदेचा माजी कार्यकर्ता असलेल्या मोनोजित मिश्रा आणि त्याच्या साथीदारांनी पीडितेला इन्हेलर दिल्याची बाब न्यायालयात उघडकीस आली आहे. २४ वर्षीय पीडिता पॅनिक अटॅकमुळे बेशूद्ध पडू नये, यासाठी आरोपींनी इन्हेलर आणून दिले आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला, असे सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
सरकारी वकील सौरिन घोषाल यांनी अलीपूर सत्र न्यायालयात सुनावणीदरम्यान आरोपींची १० जुलै पर्यंत पोलीस कोठडी मागितली. यावेळी ते म्हणाले, “पीडितेला श्वासोच्छवास घेण्यास अडचण निर्माण झाल्यानंतर आरोपींनी तिला इन्हेलर आणून दिले. मात्र ही मदत तिला बरं वाटावे म्हणून नाही तर पीडिता शुद्धीत आल्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यासाठी केली गेली.”
न्यायालयाने मुख्य आरोपी मिश्रा आणि विधी शाखेचा विद्यार्थी झैब अहमद आणि प्रमित मुखर्जी यांना ८ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर आरोपींना मदत करणारा सुरक्षा रक्षक पिनाकी बॅनर्जीला ४ जुलै पर्यंत कोठडी सुनावली.
सरकारी वकील घोषाल यांनी आरोपींना अधिक पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. कारण मुख्य आरोपी मिश्रा हा प्रभावशाली असून तो तपासावर परिणाम टाकू शकतो, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. जर आरोपींना जामीन मिळाला तर ते पीडितेला धमकावून पुराव्यांशी छेडछाड करू शकतात, असेही ते म्हणाले.
पोलिसांनीही न्यायालयात म्हटले की, पीडितेने दिलेल्या जबाबाशी वैद्यकीय अहवाल मेळ खात आहे. तसेच विशेष तपास पथकाने गोळा केलेले तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये गुन्हा झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
एका फार्मसी दुकानातील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी मिळवले आहे. ज्यामध्ये सहआरोपी इनहेलर विकत घेताना आढळून आला आहे. तसेच त्यादिवशी सायंकाळी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये उपस्थित असलेल्या १७ पैकी ६ विद्यार्थ्यांची चौकशीही पोलिसांनी केली आहे. त्यांचा जबाब न्यायालयात सादर करण्यात आला.