Kolkata Police social media activity shifts after West Bengal Assembly Election 2026 results as BJP forms government : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. याबरोबरच पश्चिम बंगालमध्ये १५ वर्षांपासून असलेली तृणमूल काँग्रेसची सत्ता संपुष्टात आली आहे. भाजपाच्या या विजयानंतर कोलकाता पोलिसांच्या अधिकृत एक्स हँडलमध्येदेखील एक मोठी बदल दुसून आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अकाऊंटने आता बंगालच्या मावळत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि इतर काही जणांना ‘अनफॉलो’ केले आहे.
राज्यातील सत्तेची समीकरणे बदलली की त्या नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून दिसून येतो. या अकाऊंटवरून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह याबरोबरच पंतप्रधान कार्यालय आणि गृहमंत्रालयाच्या अधिकृत खात्यांनाही फॉलो करण्यात आले आहे. तृणमूल काँग्रेसचे मुख्यालय आणि शहरातील नेत्यांच्या घरांसाठी असलेली अतिरिक्त सुरक्षा काढून घेण्याचा निर्णयही याच काळात झाल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर भाजपाकडून ज्येष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांची शुक्रवारी भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. यामुळे ते बंगालमध्ये भाजपाचे पहिले मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अधिकारी यांचा शपथविधी सोहळा आज, शनिवारी कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानावर होणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये प्रथमच विजय मिळवत भाजपाने २९४ जागांपैकी २००पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. तर गेल्या १५ वर्षांपासून बंगालवर वर्चस्व राखणार्या तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जींचा दारूण पराभव झाला आहे. या निवडणुकीत भाजपा आणि तृणमूल काँग्रेसला मिळालेल्या मतांमध्ये पाच टक्क्यांचा फरक आहे. भाजपाने ४५.५ तर तृणमूल काँग्रेसने ४०.६ टक्के मते मिळवली. काँग्रेस (३.२ टक्के) आणि माकपच्या (४.३ टक्के) मतांचे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा कमी राहिले.
पराभवानंतर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी आणि काँग्रेसने निवडणूक आयोगावर आरोपांच्या फैरी झाडल्या. तृणमूल काँग्रेसच्या पराभवाला ममता यांनी कथित गैरप्रकारांना जबाबदार धरले. निवडणूक आयोगावर पक्षपाताचा आरोप करत हा ‘भाजप आयोग’ असल्याचे संबोधले. मतमोजणीपूर्वी मतदान यंत्रांमध्ये फेरफार केल्याचाही आरोप त्यांनी केला होता.
