Kolkata Rape Case : पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी डॉक्टरांनी आंदोलन पुकारले आहे. डॉक्टरांच्या समस्यांचं निराकरण आणि आरोपीला शिक्षा करण्याची मागणी आंदोलकांकडून केली जातेय. या आंदोलनामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. काल रात्रभर पावसातच आंदोलकांनी आंदोलन केल्याने आज ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा आंदोलकांची भेट घेतली.

मुख्यमंत्री म्हणून नाही तर दीदी म्हणून आलेय

गुरुवारी ममता बॅनर्जी यांनी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी बैठकीचं आयोजन केलं होतं. परंतु, थेट प्रेक्षपणाच्या अटीवर अडून राहिलेल्या आंदोलकांनी ममता बॅनर्जींची भेट घेतली नाही. दोन तास वाट पाहिल्यानंतर ममता बॅनर्जी निघून गेल्या. आज पुन्हा त्या आंदोलनस्थळी पोहोचल्या. आजही त्यांनी आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. “मी मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर तुमची दीदी म्हणून तुम्हाला भेटायला आले आहे. माझे पद मोठे नाही. लोकांची पदे मोठी आहेत. तुम्ही रात्रभर पावसात आंदोलन करत आहात त्यामुळे मला रात्रभर झोप लागली नाही. तुमच्या सर्व मागण्या पूर्ण करू, असं वचन द्यायला मी आज येथे आले आहे”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. सर्व सरकारी रुग्णालयातील रुग्ण कल्याण समित्या बरखास्त करण्यात आल्याची घोषणाही ममता बॅनर्जी यांनी केली. “समस्या सोडवण्याचा हा माझा शेवटचा प्रयत्न असेल”, असंही त्या म्हणाल्या.

हेही वाचा >> Kolkata Rape Case : “नवा अहवाल सादर करा”, कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे सीबीआयला पुन्हा निर्देश!

कारवाई करणार नाही, हे उत्तर प्रदेश नाही

“तुम्ही कामावर परत आलात तर तुमच्या मागण्यांचा अभ्यास करून अधिकाऱ्यांशी बोलेन, असे वचन देते. तुमच्या मागण्यांकडे मी संवेदनशीलतेने लक्ष देईन. तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर मला थोडा वेळ द्या. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर मी कारवाई करेन”, असंही त्या म्हणाल्या. “मी तुमच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही. आम्ही उत्तर प्रदेश पोलीस नाही . आम्हाला तुमची गरज आहे. विचार करा आणि निर्णय घ्या”, असंही त्या म्हणाल्या.

आम्ही चर्चा करण्यास तयार

पत्रकारांशी बोलताना ज्युनियर डॉक्टर अनिकेत महतो म्हणाले, “मुख्यमंत्री हे राज्याचे पालक आहेत. आम्ही त्यांचे धरणा मंचला भेट दिल्याचे स्वागत करतो. आम्ही ३५ दिवस रस्त्यावर आहोत. आधी चर्चा केली असती. आम्ही कधीही आणि कुठेही बोलण्यास तयार आहोत. मात्र आमच्या पाच कलमी मागण्यांशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आम्हाला कामावर परत यायचे आहे.”

“जोवर चर्चा होत नाही, तोवर मागण्यांबाबत तडजोड केली जाणार नाही”, असा इशारा आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी दिला आहे. कोलकाता येथील राज्याच्या आरोग्य विभागाच्या मुख्यालयातील आरोग्य भवनाबाहेर डॉक्टर तळ ठोकून आहेत. सरकारी रुग्णालयांमध्ये चांगली सुरक्षा आणि आर. जी. कर हॉस्पिटलच्या डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी उच्च अधिकाऱ्यांची हकालपट्टी या मागण्यांचा समावेश आहे.