Kolkata Rape Case : कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येवरून ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. आरजी. कार महाविद्यालयात सुरू असलेल्या आंदोलनाला मध्यरात्री भीषण वळण घेतलं. आंदोलनस्थळी जमलेल्या जमावाने रुग्णालयाची तोडफोड केली, पोलिसांवर हल्ला केला. परिणामी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रू धुरच्या नळकांडीचा वापर करावा लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पश्चिम बंगाल आणि देशभरात बुधवारी रात्री ११.५५ वाजता ‘रिक्लेम द नाईट’ मोहिमेचा भाग म्हणून निदर्शने सुरू झाली. या मोहिमेने सोशल मीडियाद्वारे वेग घेतला. फलक घेऊन पीडितेला न्याय देण्याची मागणी करत समाजाच्या सर्व स्तरातील हजारो महिला रस्त्यावर उतरल्या. सुरुवातीला हे निदेर्शन अत्यंत शांतपद्धतीने सुरू होतं. परंतु, काही वेळातच या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं. जमावाने जबरदस्तीने बॅरिकेड्स तोडून रुग्णालयात प्रवेश केला. त्यांनी खुर्च्याही फोडल्या. जमावाने रुग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डची तसेच बाहेर उभ्या असलेल्या काही पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली. परिणामी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

हेही वाचा >> Kolkata Doctor Rape Case : “पीडितेला न्याय देण्याऐवजी…”, कोलकाता बलात्कार प्रकरणात राहुल गांधींचा गंभीर आरोप; म्हणाले, “कोणत्या विश्वासाने…”

पोलिसांनी काहीही चुकीचं केलेलं नाही

कोलकाताचे पोलीस आयुक्त विनीत गोयल यांनी या तोडफोडीसाठी सोशल मीडियावरील “दुर्भावनापूर्ण मोहिमेला” जबाबदार धरले. “येथे जे घडले ते चुकीच्या मीडिया मोहिमेमुळे आहे, जे दुर्भावनापूर्ण आहे… कोलकाता पोलिसांनी काय केले नाही? त्यांनी या प्रकरणात सर्वकाही केले आहे… आम्ही कुटुंबाचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु अफवा पसरवल्या जात आहेत. मी खूप नाराज आहे, आम्ही काहीही चुकीचे केले नाही”, असे आयुक्त म्हणाले.

एक प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणाला, आम्ही ११ वाजता आंदोलनस्थळ सोडणार होतो. पण बाहेर लोकांचा एक मोठा गट आला. आम्हाला न्याय हवाय अशी घोषणाबाजी या गटाकडून करण्यात आली. सर्वांना विनंती करूनही जमाव कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थिःतीत नव्हता. जमाव संतप्त झाला होता. ते कॅम्पसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. अचानक ते आले आणि तोडफोड करू लागले.

दरम्यान, हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले असून सीबीआयने बुधवारी रुग्णालयात जाऊन चौकशीला सुरुवात केली आहे.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolkata rape case miscreants disrupt midnight protest a wreak havoc at rg kar hospital sgk
Show comments