कोलकाता : पश्चिम बंगालमधील आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी राष्ट्रपती तसेच पंतप्रधानांना याबाबत हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. आर.जी.कर रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टवर बलात्कार व हत्याप्रकरणी निवासी डॉक्टर ९ ऑगस्टपासून आंदोलन करत आहेत. डॉक्टरांच्या संघटनेने लिहिलेल्या चार पानी पत्राच्या प्रती उपराष्ट्रपती जगदीप धनकर तसेच आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांनाही पाठविल्या आहेत.

देशाचे प्रमुख म्हणून, आम्ही तुमच्यापुढे हा प्रश्न मांडत आहोत. आमच्या एका सहकाऱ्याचा बळी गेला. त्यामुळे आरोग्यक्षेत्रातील व्यावसायिकांना निर्भयपणे कर्तव्य बजावता यावे याठी गुन्हेगारांना शिक्षा व्हायला पाहिजे अशी मागणी पत्रात करत, हस्तक्षेपाची मागणी केली आहे. ज्या पद्धतीने घडामोडी घडत आहेत ते पाहता आम्हाला अंधकार दिसतो. त्यामुळे योग्यवेळी तुम्ही हस्तक्षेप करावा अशी मागणी या डॉक्टरांनी केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला हे पत्र तयार करण्यात आले होते. ते गुरुवारी रात्री पाठविण्यात आल्याचे आंदोलनकर्ते डॉक्टर अनिकेत महातो यांनी नमूद केले.

हेही वाचा >>> हिमाचल प्रदेशात मशिदीतील अवैध बांधकामांबाबत निदर्शने ; आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून पाण्याचा मारा

नार्को चाचणीचा अर्ज फेटाळला

आर.जी.कर वैद्याकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात डॉकम्रवरील बलात्कार व हत्याप्रकरणात अटकेत असलेल्या संजय रॉय याच्या नार्को चाचणीसाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने स्थानिक न्यायालयात केलेला अर्ज फेटाळून लावला. सीबीआयने यापूर्वी रॉयची पॉलीग्राफ चाचणी केली आहे. मात्र या चाचणीसाठी रॉयने नकार दिल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

सलग तिसऱ्या दिवशी निदर्शने

पश्चिम बंगाल आरोग्य विभागाच्या मुख्यालयाबाहेर सलग तिसऱ्या दिवशी डॉक्टरांनी निदर्शने सुरू होती. पश्चिम बंगाल सरकार व आर.जी. कर रुग्णालयातील डॉक्टरांमध्ये चर्चेचा तिढा कायम आहे. जवळपास २६ वैद्याकीय महाविद्यालयातील ३० डॉक्टरांनी या निदर्शनात सहभाग झाले होते. चर्चेच्या थेट प्रक्षेपणाची मागणी सरकारने फेटाळली आहे. ही बाब न्यायप्रविष्ट असल्याने चर्चेचे थेट प्रक्षेपण शक्य नसल्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशारा डॉक्टरांनी दिला.