Viral Video US Vlogger: भारतात पर्यटनासाठी आलेल्या एका अमेरिकन ट्रॅव्हल व्लॉगरचा कोलकातामधील टॅक्सी चालकाने आणि त्याच्या सहकाऱ्याने छळ व फसवणूक केल्याचा आरोप आहे. पीडित अमेरिकन व्लॉगरचे नाव डस्टिन असून, त्याने हा प्रकार रेकॉर्ड करून नंतर आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे.
कोलकाता विमानतळावर पोहोचल्यानंतर, डस्टिनने उबर बुक करण्याऐवजी स्थानिक टॅक्सी बुक केली. त्याने ड्रायव्हरला स्पष्टपणे सांगितले की, त्याला पार्क स्ट्रीटवरील हॉटेल ग्रेट वेस्टर्नमध्ये जायचे आहे. पण, अमेरिकन पर्यटकाने सांगितलेल्या ठिकाणाऐवजी, चालकाने त्याला चुकीच्या दिशेने जवळजवळ १५ किलोमीटर दूर राजारहाटमधील द वेस्टर्न नावाच्या वेगळ्याच हॉटेलकडे नेले.
व्हिडिओमध्ये डस्टिन आणि टॅक्सी चालकामध्ये झालेला संवाद स्पष्टपणे ऐकू येत आहे. “मी तुम्हाला आधी हॉटेल दाखवले, यावर तुम्ही सहमती दर्शवली आणि नंतर तुम्ही मला चुकीच्या हॉटेलमध्ये घेऊन गेलात”, असे अमेरिकन व्लॉगर म्हणतो. सुरुवातीला, ड्रायव्हरने ७०० रुपये भाडे मागितले. पण चुकीच्या हॉटेलमध्ये सोडल्याने जेव्हा त्याने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा चालकाने माफी मागण्याऐवजी, त्याला पार्क स्ट्रीटवरील हॉटेलमध्ये घेऊन जाण्यासाठी ९०० रुपये मागितले.
“ठीक आहे, सर, आता पार्क स्ट्रीटला जाण्यासाठी ९०० रुपये लागतील,” असे ड्रायव्हर म्हणाला. पण, डस्टिन आपल्या भूमिकेवर ठाम राहिला आणि त्याने फक्त ७०० रुपये देण्याचे मान्य केले होते असा आग्रह धरला. हा वाद वाढत असताना, लाल शर्ट घातलेला एक दुसरा व्यक्ती गाडीत घुसला आणि चालकाच्या बाजूला बसला. सुरुवातीला तो परिस्थितीमध्ये मध्यस्थी करत असल्याचे दिसून आले, परंतु काही वेळातच त्याने अमेरिकन व्लॉगरला धमकी द्यायला सुरूवात केली.
“माझे माफियांशी संबंध आहेत, मी त्याला एका निर्जन ठिकाणी नेईन आणि त्याची हाडे मोडेन,” असे लाल रंगाचा शर्ट घातलेला व्यक्ती बंगालीमध्ये म्हणत असल्याचे व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे.
अखेर, चालक आणि त्याच्या सहकाऱ्याने अमेरिकन व्लॉगर डस्टिनला त्याच्या हॉटेलला जाण्यासाठी दुसरी टॅक्सी करण्यास सांगितले. पण, यापूर्वी, चालकाच्या सहकाऱ्या डस्टिनकून “पार्किंग आणि पेट्रोलसाठी” अतिरिक्त १०० रुपये मागितले, यामुळे डस्टिनला एकूण ८०० रुपये द्यावे लागले.
“भारतात माझा आतापर्यंतचा वेळ खूप छान गेला आहे. यामुळे मला या देशाचा द्वेष करायचा नाही, ही एक नेहमीची गोष्ट ज्याचा विमानतळांवर अनेकदा अनुभव येतो”, असे डस्टिन व्हिडिओच्या शेवटी म्हणाला.