Kota Bus Accident Delhi Mumbai Highway : दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर कोटा जिल्ह्यात भोपाळहून राजस्थानच्या खाटू श्याम मंदिराकडे भाविकांना घेऊन जाणारी बस उलटून भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात किमान आठ जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना शनिवारी पहाटे घडली. या बसमधून वृद्ध आणि लहान मुलांसह २५ प्रवासी प्रवास करत होते. हा अपघात एक्सप्रेसवेवरील पोल क्रमांक ३८४ जवळ सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास झाला. पीटीआय (PTI) या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, बस रस्त्यावरून घसरली आणि १५ फूट खोल नाल्यात कोसळली.
अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र प्राथमिक तपासानुसार ड्रायव्हरचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. बस नाल्यात कशामुळे कोसळली, यामागच्या परिस्थितीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. अपघातानंतर लगेचच आपत्कालीन कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येत बचावकार्य सुरू केले. मात्र, नाल्यामध्ये गाळ आणि पाणी साचल्यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाले होते. प्रशासनाने खड्ड्यातून अपघातग्रस्त बस बाहेर काढण्यासाठी क्रेन पाचारण केल्या होत्या. सुरुवातीच्या प्रयत्नांनंतर बस नाल्यातून बाहेर काढण्यात यश आले.
कोटाचे जिल्हाधिकारी पीयूष समारीया यांनी सांगितले की, १७ जणांना न्यू मेडिकल कॉलेज हॉस्पिटल (NMCH) मध्ये, तर आठ जणांना एमबीएस (MBS) हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. न्यू मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये आणलेल्यांपैकी सात जणांना मृत घोषित करण्यात आले, तर एमबीएस हॉस्पिटलमध्ये एका व्यक्तीला मृत घोषित करण्यात आले.
जिल्हाधिकारी समारीया यांनी जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली आणि त्यांच्या प्रकृतीचा आढावा घेतला.
