KP Sharma Oli arrested Nepal Unrest: नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना अटक करण्यात आली आहे. गेल्यावर्षी झालेल्या ‘जेन झी’ आंदोलनात अनेकांचा मृत्यू झाला होता, याप्रकरणी ओली यांना सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली शनिवारी (२८ मार्च) पहाटे अटक करण्यात आली. ओलींच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थकांनी काठमांडूमध्ये विविध ठिकाणी निदर्शने केली. अनेक ठिकाणी नागरिकांनी चौकशी अहवालाच्या प्रती जाळून विरोध दर्शवला.

ओलींवर चौकशी समितीची ठपका

नेपाळमध्ये सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या ‘जनरेशन झेड’च्या हिंसक आंदोलनानंतर केपी शर्मा ओली यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या आंदोलनाची चौकशी करण्यासाठी अंतरिम सरकारने चौकशी समितीची स्थापना केली होती. ओली आंदोलन हताळण्यात अपयशी ठरल्याचा ठपका अहवालातून ठेवण्यात आला आहे. तसेच, १९ आंदोलकांची गोळी झोडून मृत्यू झाल्याप्रकरणी देखील त्यांना जबाबदार धरण्यात आले आहे. ओली यांच्यासह नेपाळी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री रमेश लेखक यांनाही शनिवारी अटक करण्यात आली.

राजकीय सूडबुद्धीने कारवाई, सरकारवर टीका

माजी पंतप्रधान केपी ओली ७४ वर्षांचे असून त्यांच्यावर दोनदा मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. वैद्यकीय तपासणीनंतर काठमांडू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, नेपाळ कम्युनिस्ट पक्षाने (एकीकृत मार्क्सवादी-लेनिनवादी) या अटकेचा तीव्र शब्दात निषेध केला असून, राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचे म्हटले आहे. पक्षाचे सचिव महेश बसनेत यांनी नुकतेच पंतप्रधानपदाची शपथ घेणाऱ्या बालेन शहा यांच्यावर टीका केली. या विषयावर चर्चा करण्यासाठी पक्षाने तातडीची बैठक देखील बोलावली होती.

समर्थकांची रस्त्यावर उतरुन निदर्शने

केपी ओली यांच्या अटकेनंतर मोठ्या संख्येने त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरुन निषेध नोंदवला. अनेक ठिकाणी जाळपोळ देखील करण्यात आली. आंदोलकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी मोठा पोलिस फौजफाटा रस्त्यावर तैनात करण्यात आला होता. ओलींच्या अटकेमुळे नेपाळच्या राजकीय परिघात देखील तीव्र पडसाद उमटल्याचे दिसून आले. अनेक राजकीय नेत्यांनी अटकेची कारवाई राजकीय सूडबुद्धीने केल्याचे मत नोंदवले. तर, अनेकांनी याप्रकरणी निप:क्ष चौकशीची गरज व्यक्त केली.

बालेन शहा नवे पंतप्रधान

रॅपर म्हणून प्रसिद्ध असणारे बालेन उर्फ बालेंद्र शहा यांनी शुक्रवारी नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. गेल्या वर्षी झालेल्या आंदोलनाचे प्रतिनिधित्व बालेन यांनी केले होते. त्यांच्या राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीला नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रचंड यश मिळाले. बालेन शहा यांनी केपी शर्मा ओली यांचा पराभव केला आहे. ३५ वर्षीय बालेन शहा यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.