कधीकाळी सेल्फीसाठी रांगेत उभ्या राहणाऱ्या कार्यकर्त्यानेच केला ज्योतिरादित्य सिंधियांचा पराभव

१ लाख २३ हजार मतांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांना केले पराभूत

ज्योतिरादित्य सिंधिया आणि कृष्णा यादव
लोकसभा निवडणुकींमध्ये भाजपाने अभूतपूर्व यश मिळवले आहे. एकट्या भाजपाने ३०० हून अधिक जागा जिंकल्या आहेत. २०१४ पेक्षा अधिक मोठे यश भाजपाने संपादित केले असून भाजपाच्या या विजयी लाटेमध्ये काँग्रेसचे अनेक प्रस्थापित आणि दिग्गज नेते पराभूत झाले आहेत. मध्य प्रदेशमधील बडे नेते आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय ज्योतिरादित्य सिंधिया यांचा गुणा मतदारसंघात कृष्णा पाल यादव यांनी पराभव केला आहे. विशेष म्हणजे ज्योतिरादित्य यांचा पराभव करणारे कृष्णा हे कधीकाळी काँग्रेसचेच कार्यकर्ते होते. ज्योतिरादित्यंबरोबर सेल्फी काढण्यासाठी कधीकाळी रांगेत उभ्या राहणाऱ्या कृष्णा यांनीच त्यांचा पराभव करण्याचा भीमपराक्रम केला आहे.

कृष्णा यादव हे नाव मध्य प्रदेशमधील प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याला ठाऊक असणारे नाव. कारण कृष्णा हे ज्योतिरादित्य यांचे निकटवर्तीय होते. केपी या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या कृष्णा यांनी मागील अनेक वर्षांपासून ज्योतिरादित्य यांना मिळेलेल्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. अनेक वर्ष ज्योतिरादित्य यांच्या सोबत असल्याने केपी यांना काही महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकींमध्ये मुंगावली मतदार संघातून तिकीट मिळण्याची अपेक्षा होती. मात्र शेवटच्या क्षणी त्यांना तिकीट नाकारण्यात आले. त्यामुळे नाराज झालेल्या केपी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला.

विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात भाजपामध्ये गेलेल्या केपी यांना काही महिन्यांमध्येच भाजपाने थेट ज्योतिरादित्यंविरोधात लोकसभेचे तिकीट दिले. ४५ वर्षीय कृष्णा हे पेशाने डॉक्टर आहेत. कृष्णा यांचे वडिलही काँग्रेसमध्येच होते. त्यांच्या वडिलांच्या खांद्यावर अशोकनगर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. केपी यांना भाजपाने तिकिट दिल्यानंतर ज्योतिरादित्य यांच्या पत्नी प्रियदर्शिनी राजे सिंधिया यांनी ‘एकेकाळी केपी हे ज्योतिरादित्य महाराजांसोबत सेल्फी काढण्यासाठी रांगेत उभे असायचे’ अशी माहिती एका पोस्टच्या माध्यमातून दिली होती. या पोस्टबरोबर त्यांनी ज्योतिरादित्य यांच्या गाडीसमोर उभ्या असणाऱ्या कृष्णा यांचा फोटो शेअर केला होता.

कृष्णा यांना ज्योतिरादित्य यांच्याविरोधात तिकीट देण्यात आले त्यावेळी ज्योतिरादित्य सहज जिंकतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र कृष्णा यांनी ज्योतिरादित्य यांना अगदी प्रचारापासूनच कडवी झुंज दिली. मतमोजणीमध्येही त्यांनी अनेक ठिकाणी ज्योतिरादित्य यांना मागे टाकत आघाडी मिळवून शेवटपर्यंत ती टिकवत १ लाख २३ हजार मतांनी मोठा विजय मिळवला.

गुणा मतदार संघ सिंधिया कुटुंबियांचा बालेकिल्ला मानला जायचा. या मतदार संघातून ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या आजी विजयाराजे यांनी सहा वेळा, वडील माधवराव यांनी चार आणि खुद्द ज्योतिरादित्य यांनी चार वेळा विजयी मिळवला. २०१४ मध्ये काँग्रेसला राज्यात दोनच जागी विजय मिळाला होता त्यामध्ये गुणा मतदार संघाचा समावेश होता. यंदा मात्र भाजपाच्या लाटेसमोर ज्योतिरादित्य यांना आपली जागा पुन्हा निवडूण आणण्यात अपयश आले. सिंधिया कुटुंबियांव्यक्तिरिक्त इतर नेत्याने या मतदारसंघांचे लोकसभेत नेतृत्व करण्याची ही चौथीच वेळ ठरणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Krishna pal singh gunas newly elected mp who was mocked priyadarshini raje scindia contesting against jyotiraditya scindia