consumer court fines Kerala transport department: वेळेपूर्वीच बस सुटल्यामुळे महिलेची बस चुकली आणि यामुळे तिची रुग्णालयातील अॅपॉइंटमेंट देखील हुकली. यानंतर महिलेने ग्राहक वाद निवारण आयोगाकडे दाद मागितली. आयोगाने महिलेच्या बाजूने निर्णय देत केरळ राज्य रस्ते वाहतूक महामंडळाला महिला प्रवाशाला ३५,००० रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. यात २५,००० रुपये भरपाई आणि १०,००० रुपये खटला खर्चाचा समावेश आहे.
न्यायालय काय म्हणाले?
केरळमधील पठाणमिल्ला आयोगाचे अध्यक्ष जॉर्ज बेबी आणि सदस्य निषाद थंकप्पन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. “वेळेपूर्वी बस सोडणे आणि त्यामुळे सीट केलेल्या आरक्षित प्रवाशाची बस चुकणे, हा सेवेतील त्रुटीचा प्रकार आहे,” असे ग्राहक न्यायालयाने नमूद केले.
नेमकं प्रकरण काय?
तक्रारदार महिला २४ ऑगस्ट २०२४ रोजी कट्टाकडा येथून एर्नाकुलम येथील एका रुग्णालयात जाण्यासाठी केएसआरटीसीच्या ‘सुपर फास्ट’ बसचे तिकीट आरक्षित केले होते. ही बस सकाळी ८:०० वाजता थिरुवल्ला येथून सुटणार होती. तर, महिलेने दुपारी १२:३० वाजता डॉक्टरांकडून अॅपॉइंटमेंट घेतली होती. महिलेच्या म्हणण्यानुसार, ती सकाळी ७:३० वाजताच बस थांब्यावर पोहोचली आणि ८:१० वाजेपर्यंत वाट पाहत थांबली. बस न आल्याने तिने बसमधील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. तेव्हा कर्मचाऱ्यांनी बस थिरुवल्ला ओलांडून कोट्टायम येथे पोहोचल्याचे सांगितले आणि तिला दुसऱ्या बसने येण्यास सांगण्यात आले.
महामंडळाचा युक्तिवाद आणि न्यायालयाचा आदेश
या प्रकारामुळे महिलेला रुग्णालयात जाता आले नाही, शिवाय तिची ५०० रुपयांची फी देखील वाया गेली आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा सुट्टी काढून जावे लागल्याने तिचे आर्थिक नुकसान व मानसिक त्रास झाल्याचे महिलेने सांगितले. दरम्यान, केरळ राज्य रस्ते वाहतूक महामंडळाने महिलेचे सर्व आरोप फेटाळून लावले. “सेवेत कोणतीही त्रुटी नव्हती, त्यामुळे भरपाई देण्याची आमची जबाबदारी नाही”, असे महामंडळाने स्पष्ट केले. पण, ग्राहक आयोगाने महामंडळाचा युक्तिवाद फेटाळून लावत सेवेत त्रुटी असल्याचा ठपका ठेवला.
३५,००० नुकसान भरपाई देण्याचे आदेश
सर्व पुराव्यांची तपासणी केल्यानंतर महिलेच्या बस तिकिटाचे १४६ रुपये, तक्रार दाखल केल्याच्या तारखेपासून ९ टक्के वार्षिक व्याजासह परत करावेत. तसेच, महिलेला झालेल्या त्रासापोटी २५,००० रुपये भरपाई, न्यायालयीन खर्चासाठी १०,००० रुपये द्यावेत, असे आदेश महामंडळाला देण्यात आले.
