Kulgam Terror Attack Two Labourers killed: दक्षिण काश्मीरच्या कुलगाम येथे शुक्रवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या छत्तीसगडमधील विटभट्टी कामगारांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी श्रीनगरच्या रुग्णालयात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अतिरेकी हल्ल्यात दोन मजूरांचा मृत्यू झाला आहे. जुलै महिन्यातील हा दुसरा अतिरेकी हल्ला आहे. कुलगाममधील किलम गावात छत्तीसगडच्या दोन मजुरांना अगदी जवळून गोळी झाडली गेली. त्यापैकी दीपक नावाच्या मजूराचा जागीच मृत्यू झाला. तर भूपेंद्र नामक दुसऱ्याला अनंतनाग येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. इथे त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्याला श्रीनगर येथील रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले. शनिवारी सकाळी त्याचाही मृत्यू झाला.
दरम्यान दीपकच्या कुटुंबीयांनी एक वेगळाच आरोप केला आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, अतिरेक्यांनी या दोघांना ते कुठून आले आहेत, त्यांचा धर्म कोणता? असा प्रश्न विचारला. त्यानी हिंदू धर्माचा उल्लेख केल्यानंतर त्यांना गोळ्या झाडण्यात आल्या, असा दावा दीपकच्या कुटुंबीयांनी केला. मात्र हल्ल्याचा तपास करणाऱ्या सुरक्षा यंत्रणांनी मात्र अद्याप या दाव्याला दुजोरा दिलेला नाही.
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज या दोन्ही कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर केली.
शुक्रवारी कुलगाम येथे झालेला अतिरेकी हल्ला हा गेल्या दहा दिवसांतील दक्षिण काश्मीरमधील दुसरा मोठा अतिरेकी हल्ला होता. तसेच ऑक्टोबर २०२४ नंतर स्थलांतरित मजुरांवर झालेला हा पहिलाच हल्ला आहे. २२ जुलै रोजी अतिरेक्यांनी अनंतनाग शहरात जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष कृती गटात तैनात असलेल्या पोलिसाला अगदी जवळून गोळ्या घालून ठार केले होते.
कुटुंबीयांच्या अनुपस्थित भूपेंद्रवर अंत्यसंस्कार
भूपेंद्रचा भाऊ अनुराग भैना याने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, माझा भाऊ गेल्या चार-पाच महिन्यांपासून जम्मू आणि काश्मीरमध्ये काम करत होता. शुक्रवारी रात्री माझ्या मामांनी फोन करून कळवले की, अतिरेक्यांनी भूपेंद्रवर गोळीबार केला. त्याच्या पश्चात त्याची पत्नी आणि तीन वर्षांचा मुलगा आहे.
परराज्यात जाऊन मजुरी करण्यासाठी किती पैसे मिळतात, असा प्रश्न विचारला असता अनुराग भैना म्हणाले की, आम्हाला दररोज सुमारे १५० ते २५० रुपये मिळतात. आमची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. आमच्याकडे काश्मीरला जाण्यासाठीही पैसे नाहीत. अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले की, माझ्या भावाचे अंत्यसंस्कार तिथेच केले जाणार आहेत.
दीपक घरातील एकटा कमावता व्यक्ती
अतिरेक्यांच्या हल्ल्यात दीपकचाही बळी गेला. छत्तीसगडच्या शक्ती जिल्ह्यातील बुंदेली गावचा रहिवासी २४ वर्षीय दीपक रात्रे त्याच्या घरातील एकमेव कमावता व्यक्ती होता.
दीपकचे काका हलधर रात्रे माध्यमांशी बोलताना म्हणाले, “चांगले उत्पन्न मिळत असल्यामुळे सात-आठ महिन्यांपूर्वी दीपक आपल्या पत्नीसह विटभट्टीमध्ये काम करण्यासाठी जम्मू-काश्मीरला गेला होता. दाम्पत्याचा चार वर्षांचा मुलगा आणि अल्पवयीन बहीण छत्तीसगडमध्ये आहेत. दीपक लहान असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्याचा धाकटा भाऊ शारीरिकदृष्ट्या अपंग आहे. दीपकच्या मृत्यूमुळे आता त्यांच्या कुटुंबात उदरनिर्वाह करण्यासाठी कुणीही उरलेले नाही.”
