कर्नाटकात येत्या सोमवारी नवीन सरकार अस्तित्वात येणार होते. पण आता शपथविधीचा दिवस बदलण्यात आला आहे. कुमारस्वामी आता सोमवार ऐवजी बुधवारी २३ मे रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. जनता दल सेक्युलरचे राष्ट्रीय सचिव दानिश अली यांनी ही माहिती दिली.

राज्यपाल वजुभाई वाला यांनी जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. स्वत: कुमारस्वामी यांनी ही माहिती दिली. राज्यपालांनी मला शपथविधीसाठी निमंत्रित केले असून सोमवारी दुपारी १२ ते १ च्या दरम्यान शपथविधीचा कार्यक्रम होईल असे कुमारस्वामी यांनी आधी सांगितले होते. बीएस येडियुरप्पा औट घटकेचे मुख्यमंत्री ठरल्यानंतर आता कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, तेलंगणचे मुख्यमंत्री के.सी.राव यांनी फोन करुन शुभेच्छा दिल्या असे कुमारस्वामी यांनी सांगितले. मी सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना शपथविधी सोहळयाचे निमंत्रण दिले आहे असे त्यांनी सांगितले. कुमारस्वामी यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी १५ दिवसांची मुदत दिली आहे. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आपण सरकार स्थापनेसाठी राज्यपालांच्या निमंत्रणाची वाट पाहत आहोत असे कुमारस्वामी यांनी म्हटले होते.

सरकार बनवण्यासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने बीएस येडियुरप्पा यांनी बहुमत चाचणीआधीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. बहुमत सिद्ध करण्यासाठी १११ आमदारांचा पाठिंबा आवश्यक होता. पण भाजपाकडे १०४ आमदार होते. बहुमतासाठी बरेच प्रयत्न करुनही सात आमदारांचा पाठिंबा जमवणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर येडियुरप्पांनी बहुमत चाचणीलासामोरे जाण्याआधी राजीनामा दिला.
मी आता १५० पेक्षा जास्त जागा जिंकूनच परत येईन असे सांगत येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला. राजीनामा देण्यापूर्वी ते काहीसे भावूक झाले होते. .