निवडणूक आयोगापासून संपत्तीची माहिती लपवल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांच्यासह ८ नेत्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुमार विश्वास आणि इतर ७ आमदारांनी निवडणूक आयोगापासून आपल्या संपत्तीची माहिती लपवल्याचे वृत्त ‘टाइम्स नाऊ’ने दिले आहे. तपासात या नेत्यांचा खासगी कंपन्यांशीही संबंध असल्याचे समोर आले आहे. हे कृत्य ‘रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स अॅक्ट’च्या कलम १२५ (ए)चे उल्लंघन असून यासाठी ६ महिन्यांची कैद किंवा दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

असीम अहमद खान, आदर्श शास्त्री, कैलाश गहलोत, मोहम्मद युनूस, प्रमिला टोकस, राजेश ऋषि आणि कुमार विश्वास या नेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. आदर्श शास्त्री हे माजी पंतप्रधान दिवंगत नेते लालबहादूर शास्त्री यांचे नातू आहेत. ते ब्रिटनच्या एका कंपनीचे संचालक आहेत. याची माहिती त्यांनी २०१५ मध्ये निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दिलेली नाही. याबाबत शास्त्रींना खुलासा मागितला असता त्यांनी आपण ‘मानद संचालक’ असल्याने याची माहिती देणे गरजेचे नसल्याचे वाटले, असे त्यांनी म्हटले. परंतु, टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार कंपनीच्या दस्ताऐवजावर कुठेही मानस संचालकाचा उल्लेख नाही. तर मोहम्मद युनूस यांच्याकडे फेडरेशन ऑफ ऑल इंडिया हज उमराह टूर ऑर्गनाइजेशन नावाच्या कंपनीचे शेअर्स आहेत. त्याचा उल्लेख त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात केलेला नाही. कैलाश गेहलोत यांचे रोजी बिल्डर्स प्रायव्हेट लि. आणि सुपरस्टार्स इनोव्हेशन प्रायव्हेट लि.मध्ये शेअर्स आहेत.

तर आमदार राजेश ऋषी यांच्या पत्नी या विनर इलेक्ट्रोटेक प्रायव्हेट लि.च्या संचालक आहेत. ही माहिती त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात दिलेली नाही. प्रतिज्ञापत्र दाखल केल्यानंतर त्यांची पत्नी संचालक झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. प्रमिला टोकस यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या पतीच्या नावे असलेल्या शेअर्सचा उल्लेख नाही. ही संपत्ती पतीची असल्यामुळे त्याची निवडणूक आयोगाला माहिती देणे योग्य वाटले नसल्याचे त्या म्हणाल्या.