दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता जोर धरू लागला आहे. आप, भाजपा आणि काँग्रेसमध्ये घमासान सुरू झालं असून, पूर्वाश्रमीचे ‘आप’चे नेते आणि कवी कुमार विश्वास यांनीही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चिमटा काढला आहे. १५ जानेवारी रोजी लष्कर दिन साजरा करण्यात आला. यानिमित्तानं मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ट्विट करून शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांच्या ट्विटवर कुमार विश्वास यांनी “चुनाव पण काय अवघड गोष्ट आहे. लष्काराच्या कामावर प्रश्न उपस्थित करणारेच शुभेच्छा देत आहेत,” असा टोला लगावला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ८ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. त्यामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापले असून, एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. यातच केजरीवाल यांच्या एका ट्विटवरून कवी कुमार विश्वास यांनी टीका केली आहे. केजरीवाल यांनी लष्कर दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या. केजरीवाल यांचं ट्विट कुमार विश्वास यांनी रिट्विट करून उत्तर दिलं आहे. “चुनाव पण खूप अवघड गोष्ट आहे. लष्कराच्या पराक्रमावर प्रश्न उपस्थित करून जगात भारताला आणि भारतीय लष्कराला संशयाच्या फेऱ्यात उभं केलं होतं. तेच आज लष्कराला शुभेच्छा देत आहे,” असं विश्वास यांनी म्हटलं आहे.
११ तारखेला निकाल-
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसाठी ८ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. तर निकाल ११ फेब्रुवारी रोजी लागणार आहेत. निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने सर्व ७० जागांवरील उमेदवारही जाहीर केली असून, दिल्ली कुणाला कौल देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
